कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरातील दुकाने, आस्थापणे, भाजी मार्केट आदी ठिकाणी निर्जंतुकीकरणाची गरज लक्षात घेऊन बेळगाव महापालिकेतर्फे आज मंगळवारी शहरातील पहिले “डिसइन्फेक्टंट स्प्रे टनल” (डीएसटी) कार्यान्वित केले जाणार आहे.
बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी बेळगावातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 होती ती आता रविवारी 7 इतकी वाढली आहे. परिणामी जिल्हा प्रशासनासह बेळगाववासियांमध्ये चिंतायुक्त दडपणाचे वातावरण आहे. यासाठीच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बेळगाव महापालिकेने दुकाने, आस्थापने, मार्केट आदी गर्दीच्या ठिकाणी डिसइन्फेक्टंट स्प्रे टनल (डीएसटी) अर्थात जंतुनाशक फवारणी भुयार उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे संबंधित ठिकाणी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. महापालिकेकडून शहरात उभारल्या जाणाऱ्या 4 डीएसटी पैकी पहिले डीएसटी बी. एस. येडियुरप्पा मार्गावरील भाजी मार्केट येथे आज मंगळवारी कार्यान्वित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे उर्वरित तीन डीएसटी शहरातील सर्वाधिक गर्दी होणाऱ्या अन्य ठिकाणी उभारले जाणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव मनपाने एपीएमसी येथील आपले कार्य थांबविले आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नियम धुडकावून लावून व्यापारी आणि ग्राहकांची त्याठिकाणी प्रचंड गर्दी होत असल्याने मनपाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याठिकाणी डीएसटी उभारले जाण्याची शक्यता नाही. यासाठी तालुका प्रशासनाला आपले स्वतःचे होलसेल भाजी मार्केट सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. बेळगाव तालुका आणि शहरासाठी होलसेल भाजी मार्केटच्या चार जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. याठिकाणी उर्वरित डीएसटी उभारण्याचा महापालिकेचा विचार आहे.
चेन्नईने देशात पहिल्यांदा डीएसटी उभारणीचा प्रयोग केला जो अत्यंत यशस्वी झाला आहे. त्यामुळेच बेळगावमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत व्हावी यासाठी डीएसटीची उभारणी केली जात असल्याचे पालिकेचे सहाय्यक कार्यकारी अभियंता व्ही. एस. हिरेमठ यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
बेळगाव महापालिकेने डीएसटी सेट बनवण्याचे कंत्राट सरकारी कंत्राटदार अदील मतवाले यांना दिले आहे. अदील मतवाले यांनी प्रथम या प्रकल्पाचा संपूर्ण अभ्यास केला तसेच तंत्रज्ञानाची माहिती करून घेतली आणि त्यानंतरच डीएसटी बनवण्याचे कंत्राट स्वीकारले आहे. आपण हे कंत्राट यशस्वीरीत्या पूर्ण करू असा अदील मतवाले यांना विश्वास असून बेळगावात एक डीएसटी सेट बनवण्यासाठी त्यांना एक दिवस लागणार आहे. कंत्राटदार मतवाले यांनी सोमवारी आपल्या कामाला सुरुवात केली आहे.
आपण फेब्रिकेशनचे काम केले असून पाईप आणि नोझल्स जोडले आहेत. डीएसटीच्या बाजूला 2000 लिटर क्षमतेची टाकी असणार असून या टाकीतील जंतुनाशक मिश्रण पाईप आणि नोझल्सव्दारे 1 एचपीच्या इलेक्ट्रिक पंपाच्या सहाय्याने फवारले जाईल, असे अदिल मतवाले यांनी सांगितले. डीएसटीचे टनलं अर्थात भुयार 8 फूट रुंद आणि 15 फूट लांब असणार आहे. ज्यामधून नागरिक चालत जाण्याबरोबरच दुचाकी वाहने देखील जाऊ शकतील, अशी माहितीही मतवाले यांनी दिली. या डीएसटीमध्ये नागरिकांवर सुमारे 5 सेकंदासाठी अत्यंत प्रभावी जंतुनाशक मिश्रणाची फवारणी केली जाईल. आपण तयार केलेले डीएसटी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पसंत पडले आहे. एका डीएसटीच्या उभारणीसाठी सुमारे 1 लाख रुपये खर्च येतो असेही अदिल मतवाले यांनी सांगितले. हा डीएसटी प्रकल्प गर्दीच्या ठिकाणची परिस्थिती हाताळण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मत महापालिका अधिकाऱ्यांमधून व्यक्त केले जात आहे.