आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझाइनर म्हणून गेल्या पंधरा वर्षांपासून मंजिरी संग्राम पाटील कार्यरत आहेत.अनेक निवासी आणि व्यावसायिक इमारतींचे डिझाइन आणि बांधकाम करून बांधकाम व्यवसायात त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.
मूळच्या पुण्याच्या असलेल्या मंजिरी पाटील या विवाहानंतर बेळगावात आल्या.त्यांचे पती संग्राम पाटील हे देखील एक नामवंत इंजिनियर आहेत.आपल्या पती समवेतच त्या डिझायनिंग आणि इंटिरियर डिझायनर म्हणून काम करतात.आजवर पुणे,मुंबई आणि बंगलोर येथे त्यांनी अनेक प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत.सध्या बेळगाव,गुलबर्गा येथे अनेक बंगल्याचे,कमर्शिअल कॉम्प्लेक्स आणि सभागृहाचे काम करत आहेत.अनेक शाळा आणि कॉलेजच्या इमारतींचे देखील त्यांनी काम केले आहे.
कामाच्या व्यापामुळे सदैव त्या बिझी असतात पण वेळ मिळेल तेव्हा त्याचा सदुपयोग त्या समाजकार्यासाठी करतात हे त्यांचे वैशिष्ठय म्हणावे लागेल.आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण देणे असतो ही भावना प्रत्येकाने मनात जपून आपल्यापरीने समाजासाठी कार्य केले पाहिजे असे मंजिरी पाटील सांगतात.अनेक गरजू विद्यार्थी,गरजू व्यक्ती आणि आजारी व्यक्तींना त्यांनी मदत केली आहे.हे सगळे प्रसिद्धीपासून दूर राहून त्या आपल्यापरीने कार्य करत आहेत हे कौतुकास्पद म्हणावे लागेल.समाजकार्य करणे हाच आपला छंद असल्याचे मंजिरी म्हणाल्या.
गेल्या तेरा वर्षांपासून मंजिरी या इन्नरव्हील क्लब ऑफ बेळगावच्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत.यावर्षी त्यांच्याकडे इंटरनॅशनल सर्व्हिस ऑर्गनायजर पद देखील सोपविण्यात आले आहे.किल्ल्यातील रहिवाशांसाठी कार्यरत असणाऱ्या युनायटेड फोर्ट ऑर्गनायझेशनच्या सदस्य म्हणूनही त्या कार्य करत आहेत.स्मार्ट सिटी सौहार्द सोसायटी आणि स्मार्ट व्हिजन चिट फंडस प्रा.लि. च्या संचालक म्हणूनही त्या कार्यरत आहेत.त्यांची कन्या रविना हिने देखील सिव्हिल इंजिनियरिंगची पदवी संपादन केली असून सध्या ती पुण्यात उच्च शिक्षण घेत आहे.
इतरांपेक्षा वेगळे काय करता येईल याचा सदैव आपण विचार करायला पाहिजे.तुमचे काम इतरांपेक्षा वेगळे असेल तरच त्याला दाद मिळते.इमारतींचे डिझाइन करताना नेहमी नाविन्याचा ध्यास बाळगते .त्यामुळे लोकांना डिझाइन पसंद पडतात आणि लोक डिझाईनचे कौतुक करतात.इंटिरियर डिझाइनर म्हणून जबाबदारी पार पाडताना तर नावीन्य आणि कल्पनाशक्ती याची कसोटी लागते.सतत नवनिर्मितीचा ध्यास मी बाळगते असे मंजिरी पाटील यांनी सांगितले.