Friday, April 26, 2024

/

जेवण मिळणे दुरापास्त असणाऱ्यांना “त्यांने” केलेले चक्क मिठाईचे वाटप..

 belgaum

बेळगाव लाॅक डाऊनमुळे शहरातील हातावर पोट असलेल्या लोकांसह गोरगरिबांची मोठी परवड होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील पवन ओझा या मिठाई दुकानदाराने एक आदर्श उपक्रम राबविताना आपल्या दुकानातील तयार मिठाई मंगळवारी गोरगरीबांमध्ये वाटून टाकली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशावरून बेळगाव शहरासह संपूर्ण जिल्हा लोक डाऊन करण्यात आला आहे. शासनाचा हा लॉक डाऊन 31 मार्च 2020 पर्यंत कायम राहणार आहे. या कालावधीत शहरातील रेशन दुकाने, जीवनावश्यक वस्तुंची दुकाने आणि औषधाची दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. लाॅक डाऊनचा कालावधी समाप्त होण्यास अद्याप 7 दिवस शिल्लक असल्यामुळे बेळगाव रेल्वे स्टेशन येथील प्रसाद स्वीट मार्टचे मालक पवन ओझा यांना एक कल्पना सुचली. आपले दुकान आठवडाभर बंद राहिल्यास दुकानातील बहुतांश मिठाई ऐवीतेवी खराब होणार त्यापेक्षा तिचा सदुपयोग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार आपल्या दुकानातील मिठाई सद्यपरिस्थितीत भुकेल्या अवस्थेत जीवन जगणाऱ्या गोरगरीबांना वाटून टाकण्याचे पवन ओझा यांनी ठरविले.

Sweet distribute
Sweet distribute

आपल्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रवी साळुंखे यांच्या मदतीने ओझा यांनी प्रशासन व पोलीस खात्याकडून कांही काळापुरते दुकान उघडण्यास रीतसर परवानगी घेतली. त्यानंतर आज मंगळवारी सकाळी बेळगाव रेल्वे स्टेशन येथील प्रसाद स्वीट मार्ट हे आपले दुकान अर्ध्या तासासाठी उघडून पवन ओझा यांनी सर्वप्रथम रेल्वे स्थानक व नजीकच्या बस स्थानक परिसरातील गोरगरीब लोकांना तसेच बस व रेल्वे रद्द झाल्यामुळे खोळंबून पडलेल्या लोकांना मिठाईचे वाटप केले. तसेच त्या सर्वांना आपल्या दुकानातील बिसलरी पाण्याच्या बाटल्या देखील दिल्या.

 belgaum

रेल्वे स्थानक परिसरात मिठाईचे वाटप केल्यानंतर पवन ओझा यांनी आपले मित्र रवी साळुंखे व कुलदीप बाटला यांच्या मदतीने दुकानातील शिल्लक मिठाई कारगाडीत भरुन गंगम्मा चिकुंबीमठ शहापूर, किल्ला तलाव रस्त्याशेजारी दगडाच्या साहित्यांचा व्यवसाय करणारे पाथरवट आणि कलखांब झोपडपट्टी येथे त्या मिठाईचे वाटप केले. बेसन लाडू, पेढे, बुंदीचे लाडू, जिलेबी आदींचा वाटप केलेल्या मिठाईमध्ये समावेश होता. यापैकी बहुतांश मिठाई नुकतीच तयार केलेली होती. सध्याच्या परिस्थितीत जेवण मिळणे कठीण असताना आपल्याला चक्क मिठाई खावयास देणाऱ्या ओझा यांना याप्रसंगी उपस्थित गोरगरीब दुवा देताना दिसत होते. मिठाई दुकानदार पवन ओझा यांच्या या आदर्शवत उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.