शहापूरच्या श्यामाप्रसाद मुखर्जी अर्थात एसपीएम रोडवर शिवाजी उद्यानाच्या बाजूस रस्त्यावर पडलेला धोकादायक फसवा खड्डा अद्यापपर्यंत बुजविण्यात आलेला नाही. तेंव्हा आता भारतीय पुरातत्व खात्याने तो “खड्डा” म्हणजे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे असे उपहासात्मक उद्गार नागरिकांत काढले जात आहेत.
शहापूरच्या श्यामाप्रसाद मुखर्जी रोडवर शिवाजी उद्यानाच्या बाजूस रस्त्यावर पडलेल्या धोकादायक फसव्या खड्ड्याबाबत गेल्या बऱ्याच दिवसांपासून तक्रारी केल्या जात आहेत. तथापि आजतागायत हा खड्डा बुजवून रस्ता दुरुस्त करण्यात आलेला नाही. परिणामी याठिकाणी सातत्याने अपघात तर घडत असतातच शिवाय ट्रक, टेम्पो आदी वाहने या खड्ड्यांमध्ये अडकून पडल्याचे चित्र सातत्याने पहावयास मिळते. त्याचप्रमाणे या खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसानही होत आहे. सदर खड्डा बुजवण्यात बाबत वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना या खड्ड्याची कल्पना आहे की नाही हे माहीत नाही तथापि आजपर्यंत या धोकादायक खड्ड्याची त्यांनी दखल घेतली नाही. पोलीस खात्याचे ही या खंडाकडे दुर्लक्ष झाले आहे पोलिसांनी सध्या शहरभरात इतके बॅरिकेड्स टाकले आहेत की “बॅरिकेड्सचे शहर” म्हणून बेळगावचा नावलौकिक होण्याची शक्यता आहे. तथापि आश्चर्याची गोष्ट म्हणजे शहरात ठिकाणी बॅरिकेड्स घालणाऱ्या पोलीस खात्याला शिवाजी उद्यानासमोर येथे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याच्या ठिकाणी घालण्यासाठी अद्याप एकही बॅरिकेड मिळालेला नाही.
बेळगाव महापालिका, स्मार्ट सिटी लिमिटेड बेळगाव आणि सार्वजनिक बांधकाम खाते या तिघांमध्ये सदर खड्डा नेमका कोणाच्या कार्यक्षेत्रात येतो हे अद्याप निश्चित झालेले नसावे आणि त्यामुळेच हा खड्डा अजूनही बुजवण्यात आलेला नसावा असे नागरिकांना वाटत आहे. तेंव्हा आता या खड्ड्याकडे कोणीच लक्ष देणार नसल्यामुळे भारतीय पुरातत्व खात्याने हा “खड्डा” राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावा असे उपहासात्मक उद्गार नागरिकांत काढले जात आहेत.