काही कला वारशाने लाभतात, काही कष्टाने साध्य करता येतात, तर काही उपजत अंगी असतात. कला माणसाचे जीवन समृद्ध करते. माणसाच्या जगण्याला एक वेगळा अर्थ देते. माणसाला निराशा टाळायची असेल, तर त्याच्याकडे कोणती ना कोणती कला असावी लागते.तुमचे जीवन बहूपेडी, अनेक कलानीयुक्त असेल तर तुमचे जगणे बहारदार होऊन जाते.
चौसष्ट कला पैकी एक संगीत कला.अरुण इंजिनिअरिंग मध्ये लोखंडात काम करता करता शंकर पाटील रमले संगीतात..संगीत भूषण असणाऱ्या पाटलांनी, चंद्रज्योतीत, नकळत संगीताचे बीज पेरले. आपल्यातले सर्वस्व त्यांच्या गळ्यात उतरवले, त्याच बरोबर लेकीच्या अंतरंगातले स्वर काळजीपूर्वक जपले,फुलवले आणि सुरात आणले.पहिलाच शिक्षक घराचाच असल्याने ज्योतीची कला कलेकलेने वृद्धिंगत झाली. पुढे त्यांनी कडलास्कार बुवा संगीत विद्यालयात आपल्या सुरांना मोहरदार बनवले.हे बंदया रुपया सारखे संगीतातले खणखणीत नाणे,अनेक मैफलीत खणखणू लागले. त्याच्या अस्सलपणाला दर्दी लोकांची वाहवा मिळाली.
बक्षिसांचा खच पडू लागला. पुन्हा पुन्हा एकाच ठिकाणची मैफलीची आमंत्रण यायला लागली. लोक त्यांच्या स्वराच्या जादूवर मोहित झाले. त्यांच्या स्वराचा कस असा की, एकाच ठिकाणी त्यांनी खानापूरात 17 वेळा कार्यक्रम करून विक्रम केला.सध्या ज्ञान प्रबोधन शाळेत संगीत शिक्षिका म्हणून त्या विद्यार्थ्यांना स्वराची ओळख करून देत आहेत,त्याच बरोबर आपली साधनाही त्यांनी अधिक जोमानी चालू ठेवली आहे.संगीत विशारद मंजुश्री खोत यांच्या कडून त्या संगीतातल्या सूक्ष्मतेतले धडे घेत आहेत.
आवाजाच्या गोडव्याने त्यांना अनेक दारे खुली करून दिली आहेत. बहारदार सूत्रसंचलन करण्यात त्यांच्या हातखंडा आहे. सुस्पष्ट शब्दाच्या उच्चाराने ऐकणारा मोहून जातो व त्यात रंगूनही जातो. त्यानंच्या सूत्रसंचालनाने गाजलेले अनेक कार्यक्रम रसिकांच्या लक्षात आहेत. गेली सात वर्षे त्या लहान मुलांसाठी उन्हाळी संगीत शिबिरही घेत आहेत, त्या माध्यमातून अनेक विध्यार्थ्यांना संगीताची गोडी लावली आहे.प्रा.संध्या देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या नाट्य क्षेत्रातही प्रवेश कर्त्या झाल्या आहेत.बेळगावच्या परंपरेत भर घालणाऱ्या चैत्रोत्सव व शारदोत्सवामध्ये गाणी गायिली आहेत.
अश्या उत्साही व्यक्तिमत्वाला 2006 साली दिशा चॅरिटेबल ट्रष्ट कडून महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवलेले आहे.2007 सालच्या बेळगाव भूषण पुरस्काराने त्यांच्या संगीत सेवेला पोचपावती दिलेली आहे.1400 मुले 14 भाषेत एकत्रित गाणं म्हटलेल्या 14 नोव्हेंबर 2014 रोजी झालेल्या वर्षा भावे यांच्या देशव्यापी बालस्वर योजनेत सह शिक्षिका म्हणून त्यांनी कर्तव्य बजावलेलं आहे.असे हे संगीतमय व्यक्तिमत्व बेळगाव भूषण आहे आजच्या महिला दिनी त्यांच्या योगदानास बेळगाव live च्या शुभेच्छा…