स्थानिक पातळीवर धोकादायक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी येत्या मंगळवार दि. 31 मार्च 2020 पर्यंत बेळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात 144 कलमान्वये जमावबंदीचा आदेश जारी केला आहे.
स्थानिक पातळीवर नागरिकांचा सामूहिक वावर असतो. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग सुलभपणे होण्याचा धोका असल्याने जिल्हादंडाधिकारी अर्थात जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगाव शहरासह जिल्ह्यात 144 कलम लागू केले आहे. या कलमामुळे चार पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमतात येणार नाही. परिणामी कोरोना विषाणूचा मानवी जीवनाला धोका निर्माण होणार नाही, तसेच या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या वेगाला काही प्रमाणात आळा बसू शकणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव होऊन सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून 144 कलमान्वये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे परगांवाहून विशेषता परदेशातून येणाऱ्या नागरिकांची काटेकोर वैद्यकीय तपासणी केली जात आहे. या नागरिकांमध्ये कोरोना विषाणुची लक्षणे नसली तरीही त्यांचे विलगीकरण (आयसोलेशन) करून त्यांच्यावर 14 दिवस लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगांव जिल्ह्यातील परिवहन मंडळाच्या बस गाड्यांसह अन्य सर्व प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांवर महाराष्ट्र व गोवा राज्यात प्रवासी वाहतूक करण्याची बंदी घातली आहे. ही बंदी येत्या 31 मार्चपर्यंत लागू राहणार आहे.