कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर देशभरात लाॅक डाऊन असले तरी रस्त्यावर फिरणारे यांची संख्या काही कमी झालेले नाही. त्यामुळे बेळगाव पोलिसांनी शहरातील अशा अतिउत्साही लोकांवर कारवाई करून एकूण 54 वाहने जप्त केली असून संबंधितांना नोटीस पाठवली आहे.
देशात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी लॉक डाऊन करून सर्वांना घरी राहण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. तथापि अनेक जण रस्त्यावर फिरत आहेत. दुचाकीस्वारांवर लाठीमार होत असला तरी अद्याप गर्दी कमी होत नसल्याने पोलिसांनी आता दुचाकी वाहनेच जप्त करण्यास सुरुवात केली आहे.
पोलीस खात्यातर्फे सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात सदर कारवाईला सुरुवात करण्यात आल्यानंतर आज मंगळवारी बेळगाव शहरात एकूण 54 वाहने जप्त करण्यात आली. तसेच संबंधित वाहनांच्या मालकांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे दुचाकीधारकांना आता न्यायालय सुरू झाल्यानंतरच त्यांच्या दुचाकी परत मिळणार आहेत.
बेळगाव जिल्ह्यात काल सोमवार पर्यंत चार दिवसात 301 दुचाकी वाहने जप्त करून संबंधितांना नोटिस पाठविण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कारवाई गोकाकमध्ये झाली असून त्यानंतर चिकोडी, अथणी, रायबाग व बैलहोंगल तालुक्यांमध्ये दुचाकी जप्तीची कारवाई झाली आहे. दरम्यान कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एकूण 84 ठिकाणी चेक पोस्ट बनविण्यात आले असून लॉक डाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी 41 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.