पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे प्राणघातक कोरोना विषाणूंवर मात करायची असल्यास प्रत्येकाने आपापल्या घरातच राहणे हा एकमेव उपाय आहे. बेळगावात अद्यापपर्यंत तरी कोरोना बाधित एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, सर्वांना फक्त एकच कळकळीची विनंती आहे की, पुढील 20 दिवस त्यांनी कृपया आपापल्या घराबाहेर पडू नये, असे आवाहन बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी केले आहे.
देशभरासह राज्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तांगडी गल्ली येथील एकता युवक मंडळ आणि नारायणी मल्टीपर्पज सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने कलमठ रोड येथील पायनियर अर्बन बँकेच्या परिसरात बुधवारी सकाळी कीटकनाशक फवारणी उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी उपस्थित असलेल्या आमदार अनिल बेनके यांनी “बेळगाव लाईव्ह”शी बोलताना उपरोक्त आवाहन केले
कांगळी गल्ली एकता मंडळाने काल ताशीलदार गल्ली भांदूर गल्लीत फुलबाग गल्ली भागात फवारणी केली आहे तर बुधवारी कलमठ रोड मारुती गल्ली पांगुळ गल्ली भागात केली अश्या पद्धतीनं 21 दिवस शहरातील विविध भागात स्व खर्चाने फवारणी मोहीम राबवणार आहेत.
बेळगाव शहरात आतापर्यंत एकही कोरोना बाधित व्यक्ती आढळून आलेली नाही. जे संशयित आठ रुग्ण आढळून आले आहेत त्यापैकी चार जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे आणि उर्वरितांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. तेंव्हा लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. चीन, इटली, अमेरिका आदी देशांमध्ये कोरोनाचा जो फैलाव झाला तो तेथील नागरिकांनी आवश्यक ती पूर्व खबरदारी न घेतल्यामुळे झाला आहे. हे लक्षात घेऊन आपण सर्वांनी योग्य ती खबरदारी घेतल्यास तसेच पुढील 20 दिवस घरामध्येच राहिल्यास आपल्याला प्राणघातक कोरोना विषाणु प्रादुर्भावावर मात करणे शक्य होणार आहे. तेंव्हा नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये. आता काय सर्व बंद आहे, असे म्हणून युवापिढीने गल्लीबोळात क्रिकेट, कबड्डी वगैरेसारखे खेळ खेळू नयेत, असे आमदार बेनके यांनी सांगितले.

बेळगावातील परिस्थितीबाबत आपण आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांची त्यांच्या घरच्या कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी रविवार पेठ येथील मार्केट हे होलसेल मार्केट असल्याने ते खुले ठेवले जावे, त्याच प्रमाणे भाजीपाल्याचा व्यापार सुरु ठेवला जावा. शहरात मास्कचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी मास्क नसलेल्या वाहनचालक व नागरिकांना पोलिसांचा मार खावा लागत आहे. यासाठी बाजारात मास्क उपलब्ध करून दिले जावेत अशी विनंती आपण जिल्हाधिकार्यांना केली. तेव्हा यासंदर्भात त्वरित योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याचे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले.
याव्यतिरिक्त कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर फक्त बीपीएल कार्ड धारकांनाच 1500 रुपये व दोन महिन्याचे अन्नधान्य (रेशन) न देता सरसकट सर्वांनाच ही सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच शहरातील डॉक्टरांना त्यांचे दवाखाने बंद करण्याचा आदेश आयएमएने दिला आहे. यावर पुनर्विचार व्हावा. कारण कोरोनाची धास्ती घेतलेल्या नागरिकांमध्ये दवाखाने बंद झाल्यामुळे अधिकच घबराट पसरली आहे. तेंव्हा डॉक्टरांना किमान दररोज आपापल्या गल्लीतील नागरिकांच्या घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्याची सूचना दिली जावी, अशी विनंती देखील आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असल्याचे आमदार अॅड. अनिल बेनके यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी आमदारांनी तांगडी गल्ली येथील एकता युवक मंडळ व नारायणी मल्टीपर्पज सोसायटीच्या शहरात कीटकनाशक फवारणीच्या उपक्रमाची प्रशंसा केली. तसेच इतर मंडळांनी याचा आदर्श घ्यावा असे आवाहनही केले. एकता युवक मंडळ व नारायणी मल्टीपर्पज सोसायटीतर्फे महापालिकेच्या परवानगीने काल ताशिलदार गल्ली, भांदुर गल्ली आदी परिसरात तर आज बुधवारी मारुती गल्ली, कलमठ रोड, पांगुळ गल्ली आदी परिसरात कीटकनाशक फवारणी करण्यात आली.