भरधाव मोटरसायकलवरून येऊन महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून येणाऱ्या इराणी टोळीतील 6 जणांची उच्च न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
शाहरुख फिरोज शेख, महंमद सय्यदनूर इराणी, रफिक उर्फ मोहम्मद रफीक, अब्बास चंगेज इराणी, सलीम शेरअली शेख आणि हैदर मोसा इराणी अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत. या सहा जणांसह इतरांनी बेळगाव परिसरात मोटारसायकलवरून येऊन दागिने लंपास करण्याचा सपाटा लावत अक्षरशः धुमाकूळ घातला होता. यामधील पाच गुन्ह्यांमध्ये येथील प्रथम अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने या सर्वांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. चोरी प्रकरणातील आरोपींना या पद्धतीची कठोर शिक्षा देण्याची ही पहिलीच वेळ होती. मात्र न्यायालयाच्या निकालावर आरोपींच्या वकिलांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. आता उच्च न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी या सहा आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
उपरोक्त सहाजणांवर माळमारुती व एपीएमसी पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये मोटारसायकलवरून येऊन महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मोटरसायकलवरून दागिने लंपास करण्याच्या प्रकारामुळे त्यावेळी महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र पोलिसांनी अल्पावधीत या सहा जणांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर वेगवेगळे 33 गुन्हे दाखल केले होते. शांताबाई कुमार घोटगे (रा. महांतेशनगर), ज्योति प्रकाश तमरळ्ळी (रा. विश्वेश्वरय्यानगर), विद्यावती शिवनगौडा दोड्डगौडर (रा. रामतीर्थनगर), सुमित्रा रामचंद्र नाईक (रा. सदाशिवनगर) व निर्मला बसवराज कल्याणी ( रा. सदाशिवनगर) या महिलांनी नोंदविलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी या इराणी टोळीला गजाआड केले होते
. तथापि आता या सहाही जणांची सबळ पुराव्याअभावी उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींच्या वतीने अॅड. संतोष गडकरी, ॲड. आर. जी. भाई आणि ॲड. टी. एल पटेल यांनी काम पाहिले.