कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे घोषित करण्यात आलेल्या लाॅक डाऊनमुळे शिक्षण अथवा नोकरीसाठी परगावाहून बेळगावात आलेल्या सर्वसामान्य गरीब कुटुंबातील विद्यार्थी व नागरिकांसाठी उद्यमबाग येथील हॉटेल विराटचे मालक व सामाजिक कार्यकर्ते कपिल भोसले यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. सध्याच्या बंद सदृश्य परिस्थितीत त्यांच्याकडून संबंधितांची मोफत भोजन व्यवस्था केली जात आहे.
परगाव आणि परराज्यातील अनेक जण शिक्षण व नोकरीसाठी बेळगावात वास्तव्यास आहेत. यापैकी बऱ्याच जणांची घरची परिस्थिती बेताची आहे. सध्याच्या लॉक डाऊनमुळे खानावळ, हॉटेल, रेस्टॉरंट व साध्या चहाच्या टपऱ्या देखील बंद झाल्या आहेत. परिणामी शिक्षण व नोकरीसाठी बेळगावात वास्तव्यास असलेल्या या मंडळींचे पोटापाण्याचे हाल होत आहेत. याची दखल घेऊन उद्यमबाग येथील हॉटेल विराटचे मालक व सामाजिक कार्यकर्ते कपिल भोसले यांनी अशा गरीब गरजू लोकांसाठी मोफत भोजन पुरविण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
देशव्यापी लॉक डाऊनमुळे गेले दोन दिवस हॉटेल रेस्टॉरंट आदी सर्व कांही बंद होते. या कालावधीत कपिल भोसले यांनी परगावच्या 50 हून अधिक गरीब व गरजू लोकांना मोफत भोजन पुरविले आहे. आज गुरुवारी देखील त्यांचा हा उपक्रम सुरूच होता. सध्याच्या लॉक डाऊन कालावधीत बेळगावात असलेल्या परगावच्या ज्या मंडळींचे पैशाअभावी जेवणाचे हाल होत असतील त्यांनी 9844595385 या मो. क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कपिल भोसले यांनी केले आहे. तसेच आपला हा उपक्रम फक्त परगावच्या गरीब व गरजू लोकांसाठीच असल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.