धोकादायक कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासन व आरोग्य खात्याने दिलेल्या सूचना आणि आदेशांची जनतेने काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी शनिवारी केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवार दि. 15 मार्चपासून एक आठवड्याभरासाठी जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉल्स, चित्रपटगृहे आणि बार बंद राहतील, जिल्ह्यातील विद्यापीठांसह शाळा-कॉलेज अंगणवाड्या आदी सर्व शैक्षणिक संस्था बंद राहतील, कोणत्याही क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जाऊ नयेत, सर्व उद्याने बंद राहतील, उन्हाळी शिबिरे भरू नयेत, असे जिल्हाधिकारी बोमनहळ्ळी यांनी जाहीर केले आहे.
तथापि लग्न समारंभ आणि यात्रोत्सवांना सवलत देण्यात आली असली तरी लग्न समारंभ आणि यात्रोत्सव साध्या पद्धतीने पार पाडणे आवश्यक आहे. एसएसएलसी, पीयुसी आदी महत्त्वाच्या परीक्षा मात्र वेळापत्रकानुसार होतील. तसेच आयटी आणि आयटीबीटी उद्योग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी घरातून काम करावयाचे आहे. आवश्यक ती खबरदारी घेऊन सर्व सरकारी कार्यालये देखील नेहमीप्रमाणे सुरू राहतील, हे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
परदेशातून बेळगाव शहर आणि जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांनी सर्वप्रथम शासकीय रुग्णालयात अथवा दवाखान्यात आपली संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे कोरोना विषाणूची लक्षणे दिसू दे अथवा न दिसू दे संबंधितांनी किमान 14 दिवस घराबाहेर पडू नये. त्याचप्रमाणे सर्व सरकारी आणि खाजगी इस्पितळे, दवाखाने आणि प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एखाद्या रुग्णाच्या बाबतीत संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ जिल्हा आरोग्य खाते किंवा 104 क्रमांकाशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकार्यांनी केले आहे
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने रविवार 15 मार्च 2020 पासून एक आठवड्यासाठी “कर्नाटक बंद” जाहीर केला असून त्याअनुषंगाने जारी केलेल्या निर्देश अर्थात सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी आज शनिवारी उपरोक्त आवाहन केले आहे. तसेच सदर सूचनांची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्याची सूचना त्यांनी महापालिका आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली आहे.