माणसाच्या मानसिक शांतीसाठी देवाच्या दारात जावं लागतं.पण शासनाच्या कृपेने मंदिरात जाण्याच्या मार्गात काटे पेरण्यात आले आहेत.घुमटमाळ येथील जैन बस्तीच्या समोर सरकारच्या कृपेने चक्क रस्त्यावर लोखंडीबार आले आहेत.वृद्ध, लहान मुलं, महिला यांना धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.स्मार्ट सिटीच्या धुंदीत असलेल्या मनपाचे अधिकारी आणि लोक प्रतिनिधींना हे धोकादायक लोखंडी बार काढण्याचा विसर पडला आहे.
स्मार्ट सिटीच्या कामामुळे अनेक जीव गेले आहेत. या लोखंडी सळ्या कुणाच्या जिवाच्या प्रतीक्षेत आहेत, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.
गाव सुधारतात, सुधारणांच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. पण या कामातून किती असुविधा होतात हे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाहिलं पाहिजे. नागरिकांचे जगणे असह्य करून सुधारणा करण्यात कोणताही हशील नाही.केलेली काम अर्धवट न ठेवता पूर्ण करून पुढच्या कामाला हात घातला पाहिजे.
परंतु स्मार्ट सिटीच्या रंगात रंगलेल्या अधिकाऱ्यांनी ‘एक ना धड भराभर चिंध्या’ अशी बेळगावची अवस्था केली आहे.शहरात एक रोड असा नसेल की जिथं खुदाई झालेली नाही, मातीचे ढिगारे नाहीत. वाहन धारकांना कसरत करतच वाहने चालवावी लागतात. यातच वळीव पाऊस जर सुरू झाला तर नागरिकांचे जीवन असह्य होणार आहे.