धोकादायक कोरोना विषाणू तपासणीसाठी राज्यात स्थापण्यात येणाऱ्या प्रयोगशाळांसाठी निवडण्यात आलेल्या 5 शहरांमधून बेळगावला ऐनवेळी वगळण्यात आल्याने तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.
विधानसभेत गेल्या 9 मार्च रोजी खुद्द वैद्यकीय शिक्षण मंत्री के. सुधाकर यांनी बेळगाव, म्हैसूर, शिमोगा, बेळ्ळारी व हासन येथे कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळा उभारणीची शासनाची योजना असल्याचे सांगितले होते. तथापि दुर्दैवाने आता अगदी अखेरच्या क्षणी बेळगावला या यादीतून वगळण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काल शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेल्या चर्चेप्रसंगी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळेसाठी ऐनवेळी बेळगाव ऐवजी हुबळीचे नांव पुढे केले. त्यामुळे हुबळीसह मंगळूर, बेळ्ळारी आणि कलबुर्गी येथे कोरोना तपासणी प्रयोगशाळा स्थापण्यास केंद्राने हिरवा कंदील दाखविला आहे.
दरम्यान, खुद्द वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी सभागृह कोरोना प्रयोगशाळा स्थापण्यासाठी बेळगावचे नांव जाहीर केले असताना अवघ्या 10 दिवसात या निर्णयात बदल करून प्रयोगशाळेसाठी हुबळीचे नांव निश्चित करण्यात आल्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. यापूर्वी वैद्यकीय मंत्री सुधाकर यांनी बेळगाव हे गोवा आणि महाराष्ट्र राज्यांच्या सीमेलगत असल्याने याठिकाणी ही प्रयोगशाळा होणे किती आवश्यक आहे हे स्पष्ट केले होते.
आता अचानक बेळगाव ऐवजी हुबळी येथे कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळा स्थापण्यात येणार असल्यामुळे नापसंती व्यक्त केली जात आहे. बेळगाव बेळगाव येथे सुसज्ज सिव्हील हॉस्पिटलसह केएलई हॉस्पिटल सारखे अत्याधुनिक सुसज्ज इस्पितळ तसेच बेळगाव वैद्यकीय संशोधन केंद्र (बीम्स) आहे. जेएनएमसी मेडिकल कॉलेज, शेख होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आदींसारख्या वैद्यकीय शिक्षण संस्था आहेत. या ठिकाणी प्रतिभावंत डॉक्टर तयार होत असतात. त्याचप्रमाणे बेळगाव ते गोवा आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत चे शहर आहे. याठिकाणी सर्व प्रकारच्या वाहतुकीची व्यवस्था आहे. थोडक्यात कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळा स्थापण्यासाठी बेळगाव शहर सर्व दृष्टिकोनातून योग्य असताना प्रयोगशाळेसाठी हुबळीला प्राधान्य का देण्यात आले? असा सवाल नागरिकात केला जात आहे. तसेच या संदर्भातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.