कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बेंगलोर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या बेळगाव जिल्ह्यातील पाच संशयित रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांपैकी दोघा जणांचा रिपोर्ट हाती आला असून तो नकारात्मक (निगेटिव्ह) आहे. यामुळे तुर्तास बेळगाव आरोग्य खात्याने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
जिल्ह्यातील पाच संशयित कोरोना रुग्णांचे घशातील द्राव तपासणीसाठी बंगलोरला आरोग्य खात्यातर्फे पाठवण्यात आले होते.त्यापैकी दोन रिपोर्ट आले असून त्या दोन व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.त्यामुळे आता उर्वरित तीन व्यक्तीच्या रिपोर्टमध्ये काय येतो याची प्रतीक्षा आरोग्य खात्याला लागून राहिली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील पाच रुग्णांच्या चाचण्यांचा रिपोर्ट बेंगलोरच्या प्रयोगशाळेत अर्थात लॅबमध्ये पाठवला आहे. त्यापैकी दोघांचा रिपोर्ट आला असून संबंधित दोन्ही रुग्ण कोरोना निगेटिव्ह आहेत. ही बेळगावातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह समस्त बेळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे.
धोकादायक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने 31 मार्चपर्यंत बेळगाव जिल्हा लोक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बेळगाव शहरात मूलभूत जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांव्यतिरिक्त काही ठिकाणी इतर दुकानं सुरू आहेत. त्याचप्रमाणे कांही ठिकाणी दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने आपापले व्यवहार बंद ठेवले आहेत. रेल्वे स्टेशन आणि मध्यवर्ती बस स्थानक ही नेहमी गजबजलेली असणारी ठिकाणे सध्या ओस पडलेली दिसत आहेत. रविवार पेठमधली सर्व दुकानं बंद असून फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत. औषधांची दुकाने सुरू आहेत.
रविवारच्या जनता कर्फ्यूनंतर आज सोमवारी शहरातील व्यवहार तुरळक प्रमाणात सुरू असल्याचे दिसून आले. जिल्हा प्रशांत प्रशासनाने लागू केलेल्या 144 कलमान्वये जमाव बंदीच्या आदेशाचा परिणाम सर्वत्र दिसून येत होता. दरम्यान कर्नाटकातील करुणा बाधित यांची संख्या 20 वरून एक दिवसात 26 इतकी झाली असल्याने आता जनतेने घरात राहूनच स्वयंस्फूर्तीने लॉक आऊट केलेला बरा असे जाणकारांचे मत आहे.