बेळगाव जिल्ह्यात परराज्यातून कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर मेडिकल चेक पोस्ट अर्थात वैद्यकीय तपासणी नाके स्थापण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी दिले.
कोरोना विषाणू प्रादुर्भावासंदर्भात बेळगाव जिल्हा पंचायतीच्या सभागृहात मंगळवारी आयोजित जिल्ह्यातील विविध धार्मिक संघटनांचे पदाधिकारी, धार्मिक गुरु, नेते आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. सध्या कर्नाटकच्या आसपासच्या राज्यांमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे त्या राज्यातील एखाद्या व्यक्तीकडून बेळगाव जिल्ह्यात या धोकादायक विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बेळगाव जिल्ह्याच्या गोवा आणि महाराष्ट्र सीमेवर वैद्यकीय तपासणी नाके सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणी डॉक्टरांसह खास प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोव्याहून बेळगावला येणाऱ्या नागरिकांची कणकुंबी येथे तपासणी केली जात आहे. गोव्याहून मोठ्या प्रमाणावर नागरिक बेळगावला दररोज ये – जा करतात.गोव्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य खात्यातर्फे कणकुंबी येथे 24 तास थर्मल थर्मामीटरद्वारे गोव्याहून येणाऱ्या व्यक्तीची तपासणी केली जात आहे. कार, बस,टेम्पो आणि अन्य वाहनातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची तपासणी आरोग्य खात्याचे कर्मचारी करत आहेत. गोव्याहून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती देखील घेतली जात आहे.
गोव्याप्रमाणे महाराष्ट्रातूनही नागरिक मोठ्या प्रमाणात बेळगावला ये-जा करत असतात हे लक्षात घेऊन या प्रवाशांसाठी हत्तरगी टोलनाका येथे वैद्यकीय तपासणी नाके स्थापण्यात आले आहेत. या ठिकाणीदेखील कार, बस,टेम्पो आणि अन्य वाहनातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची थर्मल थर्मामीटरद्वारे तपासणी केली जात आहे. याप्रमाणे अन्य ठिकाणीही जिल्ह्याच्या सीमेवर असे वैद्यकीय तपासणी नाके सुरू करण्यात आले आहेत, सांबरा विमानतळावरही आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी बोमनहळ्ळी यांनी सांगितले.
बेळगाव जिल्ह्यात धोकादायक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य खात्याकडून युद्धपातळीवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यात्रा, मेळावे आदी रद्द करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत नागरिकांना माहिती दिली जात आहे. नागरिकांनीदेखील शासनातर्फे जारी केलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी. एखादी व्यक्ती विदेशातून आली असेल तर त्याबाबत त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्र अथवा जिल्हा इस्पितळाशी संपर्क साधून माहिती द्यावी आणि संबंधिताची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी केले.
सदर बैठकीस पोलीस आयुक्त, उपायुक्त, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह धार्मिक संघटनांचे पदाधिकारी, धार्मिक गुरु, नेते तसेच शासकीय व पोलीस खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.