जगभरात कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या भीतीचा फटका साऱ्यांना बसू लागला आहे. याची खबरदारी म्हणून तोंडावर मास्क बांधून घेण्याची वेळ सध्या बेळगाव शहरात आली आहे. मात्र ही गरज आताच का भासली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामामुळे यापूर्वीच बेळगावातील नागरिकांना मास्कची गरज होती. मात्र कोरोनाची भीतीपेक्षा धुळीचा त्रास नागरिकांना अधिक होत आहे. त्यामुळे यापुढे तरी प्रशासनाने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत रस्त्यांची खोदाई आणि अर्धवट यांची टाकण्यात आलेले रस्ते त्यामुळे धुळीचे लोळ उठत आहेत. या धुळीतून प्रवास करताना नागरिकांना मास्कची गरज भासू लागली आहे. त्यामुळे मात्र यापुढे तरी हे धुळीचे लोळ कमी करावे अशी मागणी होत आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत अनेक रस्त्यांची कामे अर्धवट स्थितीत टाकण्यात आली आहेत. त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत स्मार्ट सिटीतील कामामुळे दोघा जणांचा बळी गेला आहे. तर अजूनही हीच परिस्थिती असल्याने तोंडाला पहिल्यापासूनच मास्क लावण्याची गरज व्यक्त होत आहे. मात्र निर्धयी प्रशासनाने याकडे कानाडोळा करून कोरोनाच्या भीतीपोटी मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. स्मार्ट सिटीच्या कामामुळे होणाऱ्या त्रासाचा विचार करून का सल्ला पहिलाच का दिला नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहर आणि परिसरात स्मार्ट सिटीच्या कामांना जोर आला असला तरी कोरोनाच्या भीतीपोटी अनेकांनी मास्क वापरणे सुरू केले आहे. मात्र यापूर्वी याचा वापर करण्याचा सल्ला प्रशासनाने देण्याची गरज होती. स्मार्ट सिटी अंतर्गत होणाऱ्या कामांची हेळसांड यामुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम झाला. मात्र याचे सोयरसुतक नसल्याचे प्रशासनाला दिसून येत आहे. कोरोनाच्या भीतीपोटी मास्क वापरा असा सल्ला देण्यापेक्षा स्मार्ट सिटीच्या कामाच्या त्रासामुळे मास्क वापरा असे म्हणण्याची वेळ आली आहे.