कोरोना व्हायरसच्या भारतासह जगभरातील दहशतीच्या पार्श्वभूमीवर सर्दी खोकला तापाने आजारी असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये. शाळा शिक्षक अथवा कर्मचारी आजारी असतील तर त्यांना विश्रांतीसाठी रजा देण्यात यावी, अशी सक्त सूचना राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे जारी केली आहे.
कर्नाटकात काल मंगळवारी करुणा व्हायरसचा संशयित रुग्ण सापडला असून त्या अनुषंगाने राज्यात कोणत्याही प्रकारे कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने परिपत्रकाद्वारे ही सूचना जारी केली आहे. सर्दी ताप खोकला असा कोणताही आजार असेल तर संबंधित विद्यार्थ्यांना सुट्टी द्या, अशी सूचना आता शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
या परिपत्रकाद्वारे विद्यार्थ्यांची नोंद ठेवून ते पूर्णपणे बरे झाल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळाल्या नंतरच त्यांना पुन्हा शाळेत प्रवेश द्यावा असेही बजावण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आजारी विद्यार्थी अथवा कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याबरोबरच त्यांना योग्य औषधोपचाराचा सल्ला द्यावा. पूर्णपणे बरे झाल्यानंतर डॉक्टरांच्या प्रमाणपत्रानंतरच त्यांना शाळेत प्रवेश दिला जावा, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार शिक्षण खात्यानेही आजारी विद्यार्थी शिक्षक व कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा आदेश जारी केला आहे.
बेळगाव जिल्ह्यात आणि तेही बेळगावच्या सांबरा विमानतळावर कोरोना व्हायरसचे 9 संशयित प्रवाशी आढळले असल्याची माहिती मंगळवारी सोशल मीडियावर प्रसारित झाली होती. तथापि वैद्यकीय तपासणी अंती विदेशातून आलेल्या संबंधित 9 प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे सिद्ध झाले आहे.