जिल्हा “लाॅक डाऊन”च्या निर्णयानंतर बेळगावमधील रेल्वे, बस व खाजगी प्रवासी वाहतूक बंद करण्यामागोमाग आता सुरक्षेच्या कारणास्तव मंगळवार दि. 24 मार्चपासून बेळगावचे सांबरा विमानतळ अनिश्चित काळासाठी “शटडाऊन” अर्थात बंद करण्यात आले आहे.
बेळगाव जिल्हा शटडाऊन झाल्यानंतर बेळगावातील रेल्वे, बस व खाजगी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांची प्रवासाची भिस्त विमान प्रवासावर होती. बेळगावहून बेंगलोर, मुंबई, पुणे, हैदराबाद, तिरुपती, कडाप्पा, म्हैसूर, अहमदाबाद, इंदूर अजमेर आदी शहरांना विमान सेवा देण्यात येत होती. तथापि आता हि विमानसेवा मंगळवार 24 मार्चपासून बंद करण्यात आली आहे. मुंबई, पुणे व बेंगलोर या शहरातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन बेळगाव विमानतळावरील सर्व विमान सेवा अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी गजबजलेल्या बेळगाव विमानतळावर मंगळवारी शुकशुकाट पसरला होता.
बेळगाव विमानतळ प्राधिकरणाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी ट्विट करून विमानतळ “शटडाऊन” केले जात असल्याचे घोषित केले आहे. सोमवारी रात्री उशिरा हा निर्णय घेण्यात आल्याने प्रवाशांना फटका बसून त्यांची गैरसोय झाली. या शटडाऊनमुळे दररोज 1300 ते 1400 प्रवासी विमान प्रवास करणाऱ्या बेळगावच्या विमानतळावर मंगळवारी सर्वत्र सामसूम होते.