Tuesday, January 7, 2025

/

कर्करोगग्रस्त बालकांसाठी झटणाऱ्या डॉ. अभिलाषा संपगार

 belgaum

कर्करोगावरील उपचारांपासून कोणतेही नवजात बालक अथवा मुल वंचित राहू नये यासाठी कार्यरत असणाऱ्या डॉ. अभिलाषा संपगार यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत.

मुळच्या राजस्थानच्या असलेल्या अभिलाषा यांचे शालेय शिक्षण राजस्थानच्या बिर्ला गर्ल्स पब्लिक स्कूलमध्ये झाले. कालांतराने वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी त्या बेळगांवच्या जेएनएमसीमध्ये आल्या येथेच एमबीबीएस नंतर पेडियाट्रिक विषयात त्यांनी पदवी घेतली. पदवीधर झाल्यानंतर जेएनएमसीमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्या रुजू झाल्या. येथे काम करतानाच त्यांना असे लक्षात आले की नवजात बालकांना अथवा मुलांना झालेल्या कर्करोगाबद्दल जागृती करणे महत्त्वाचे आहे. तसेच बालकांच्या कर्करोगावर उपचार करणारे केंद्र सुद्धा उत्तर कर्नाटकात नाही, तेंव्हा आपण जर या विषयाचा अधिक अभ्यास केला तर मुलांना त्याचा उपयोग होऊ शकेल असा विचार करून डॉ. अभिलाषा संपगार यांनी पीडियाट्रिक कॅन्सर म्हणजेच मुलांना होणाऱ्या कर्करोगाबाबत खास पदवी घेतली. सुदैवाने केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांनीसुद्धा मुलांना होणाऱ्या कर्करोगाबाबत पुढाकार घेतला. परिणामी केएलईमध्ये पिडियाट्रिक ऑन्कोलॉजी हा खास विभाग सुरू झाला.

दरम्यान, अभिलाषा यांना भारती विद्यापीठाची पाठ्यवृत्ती मिळाली आणि पीडियाट्रिक हिमेटाॅलॉजी ऑन्कोलॉजी या विषयाचा त्यांनी अधिक अभ्यास केला, याशिवाय टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे हे बालक कर्करुग्ण विभागामध्ये कामही केले. तेथे प्रशिक्षण घेऊन त्या बेळगावला परतल्या आणि पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी विभाग त्यांनी सुरू केला. आजतागायत या विभागात 100 हून अधिक बाल कर्करुग्ण येथे दाखल झाले असून 70 हून अधिक मुले पूर्णतः उपचार घेऊन बरी झालेली आहेत. याचे सर्व श्रेय अभिलाषा संपगार यांना जाते. अर्थात त्यांना डॉ. एम. व्ही. जाली, डाॅ. व्ही. डी. पाटील यांच्यासह अनेक तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Abhilasha
Abhilasha working cancer childrens

आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही मुलाचे उपचार थांबू नयेत यासाठी काही संस्थांची मदतही या केंद्राला मिळते आहे. मुलांच्या कर्करोगाबाबत बोलताना डाॅ. अभिलाषा म्हणतात बऱ्याचदा गरीब कुटुंबातील मुलांना कर्करोग होतो. तेंव्हा त्यांचे पालक उपचारासाठी येतात, परंतु मध्येच मुलांना घेऊन निघून जातात. कारण ही कुटुंबे स्थलांतरित होत असतात रोजंदारी, मजुरी किंवा अन्य कारणास्तव स्थलांतरित होणाऱ्या पालकांच्या मुलांच्याबाबतीत हा फार मोठा प्रश्न आहे. तसा तो कर्करोग उपचार बाबतही आहे अशा पालकांचे समुपदेशन करणे खूप महत्त्वाचे आहे, असे डॉ. अभिलाषा संपगार यांना वाटते. यासाठी कोणतेही मुलं जेव्हा या केंद्रामध्ये दाखल होते, तेंव्हा प्रथम त्यांच्या पालकांचे समुपदेशन केले जाते. उपचार होऊन बाल रुग्ण बरा झाला तरी किमान पाच वर्षे त्याच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक असते. ही महत्त्वाची माहिती त्या देतात.

आजही कर्करोगाबद्दल समाजात भीती आहे. परंतु वेळीच निदान झाल्यास कर्करोग बरा होऊ शकतो. एखाद्या मुलाला कर्करोग होतो, तेंव्हा त्याचे पालक जास्त हादरतात. परंतु त्यांनी वास्तव स्वीकारावे आणि केएलईच्या पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी विभागात मुलाला घेऊन यावे. त्याच्यावर येथे योग्य उपचार केले जातील हे ही पालकांनी लक्षात घ्यावे, असे आवाहन डॉ. अभिलाषा संपगार करतात.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.