Thursday, January 2, 2025

/

प्रणाम हॉटेलचा बेळगावकरांना अखेरचा प्रणाम!

 belgaum

संध्याकाळची वेळ.. पाउस नुकताच पडून गेलेला… वातावरणात काहीसा गारवा पसरलेला आणि अशावेळी कोणी चहा, गरमागरम भजी किंवा भडंग समोर केली तर…. तर दिल खुश होऊन जातो! भजी या पदार्थांचे नेमके हेच वैशिष्ट्य आहे. गरमागरम भजी न आवडणारा माणूस विरळा. बेळगावमध्ये खमंग रुचकर कांदा भजी मिळणारे एकमेव ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणारे ग्लोब टॉकीज समोरील प्रणाम हॉटेल मात्र ग्राहकांना प्रणाम करत आपला निरोप घेतो आहे. ही बाब खवय्यांसाठी हुरहुर लावणारी आहे.

बेळगावातील मित्र समाज, आंबा भवन येथे मिळणाऱ्या पदार्थांची चव खवय्यांच्या आणि जुन्या-जाणत्या पिढीच्या स्मरणात आजही आहे. यादीमध्ये प्रणाम हॉटेलचाही समावेश होता. येथील सर्व पदार्थ रुचकर असतं परंतु प्रत्येक हॉटेलचे एक वैशिष्ट्य असते तसे “गरमागरम खमंग रुचकर भजी” हे प्रणाम हॉटेलचे वैशिष्ट्य होते. अत्यंत खमंग चविष्ट तोंडात टाकताच विरघळणाऱ्या गरमागरम भजीसाठी प्रसिद्ध असणारे मुख्य म्हणजे शहराच्या वर्दळीच्या रस्त्यावर प्रणाम आपली प्रतीक्षा करत असे. त्यामुळे येणारे जाणारे असंख्य खवय्ये असोत, ग्लोबमध्ये चित्रपट पाहून चहासाठी हमखास प्रणाममध्ये येणारे रसिक असोत किंवा खमंग भजीच्या ओढीने दूरवरून येणारे ग्राहक असोत प्रणामने सर्वांचीच रसना अर्थात जीभ तृप्त केली. बदलत्या खाद्यसंस्कृती मध्ये चाट आणि जंक फूडवर भर दिला गेला तरी प्रणाम हॉटेलमधली भजी या सर्वांशी टक्कर देत आपले अस्तित्व अबाधित राखून होती.

Hotel pranam
Hotel pranam

प्रणाम मध्ये मिळणाऱ्या भजीशी बरोबर कोणीच स्पर्धा करू शकले नाही. गेली कित्येक दशके या हॉटेलमधील भजी खाऊन खवय्ये तृप्त झाले आहेत. पाऊस पडताना आडोसा म्हणून सुद्धा प्रणाममध्ये जायचे आणि भजीचा फडशा पाडायचा हे ठरलेलेच. इतकेच नाहीतर भजीचा आस्वाद घेत चाय पे चर्चा येथे रंगल्या आहेत.

कार्यालयातून घरी परतताना कुटुंबवत्सल गृहस्थ येथून हमखास भजी घेऊन जाताना अनेकांनी पाहिले आहे. कित्येकांच्या भेटीसाठी प्रणाम हॉटेल हे महत्त्वाचे हॉटेल होते. या सर्व आठवणी आपल्या मनात पुन्हा एकदा जागवत हे हॉटेल आता आपला निरोप घेत आहे, या वृत्ताने खाद्यप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होताना दिसत आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.