लवकरच स्मार्ट सिटी मध्ये रुपांतरीत होणाऱ्या बेळगाव शहराला अधिक क्षमतेने सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी हिडकल जलाशयाच्या (डॅम) ठिकाणी जुन्या यंत्रणेच्या जागी नवी अत्याधुनिक पाणी उपसा यंत्रणा बसविण्यात येत आहे. बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज शनिवारी या कामाची पाहणी केली.
हिडकल डॅम येथील पूर्वीची पाणीउपसा यंत्रणा अर्थात वॉटर पंपिंग मशिनरी काढून त्या ठिकाणी नवी अत्याधुनिक वॉटर पंपिंग मशिनरी बसविण्यात येत आहे. या हाय टेक्नॉलॉजी वॉटर पंपिंग मशिनरी बसविण्याच्या कामाची आज शनिवारी बेळगावचे आमदार ॲड. अनील बेनके यांनी प्रत्यक्ष हिडकल येथे जाऊन पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत कार्यकारी अभियंता चंद्रप्पा आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
हिडकल जलाशयातून बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी बसविण्यात येत असलेल्या या यंत्रणेसाठी अमृत योजनेअंतर्गत अतिरिक्त 19.59 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर हिडकल जलाशयाला भेट दिल्यानंतर आमदार अनिल बेनके यांनी कुंदरगी आणि तुम्मरगुद्दी येथील वाॅटर पंपिंग स्टेशनना देखील भेट दिली. सध्या या दोन्ही पंपिंग स्टेशनद्वारे बेळगाव शहराला पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान गतवर्षीच्या तुलनेत यंदा जलाशयांमध्ये 30.1 23 टीएमसी इतका पाणीसाठा असल्याचे पाहून आमदार बेनके यांनी समाधान व्यक्त केले. कारण इतका पाणी साठा जलाशयात उपलब्ध असल्यामुळे आता येत्या उन्हाळ्यात बेळगांवला पाणीपुरवठ्याची समस्या भेडसावणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.
गेल्या बऱ्याच वर्षापासून बेळगाव शहराला सातत्याने पाणीपुरवठ्याची समस्या भेडसावत असते. उन्हाळ्यामध्ये तर ही समस्या अधिकच तीव्र होते. अलीकडे बेळगाव शहराची व्याप्ती वाढली असल्यामुळे राकसकोप जलाशयातील पाणी शहरातसाठी अपुरे पडत आहे. यासाठी हिडकल जलाशयातून पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था अलीकडे काही वर्षापूर्वी करण्यात आली आहे. तथापि ही व्यवस्था असून देखील अद्याप बेळगाव शहराची पाणीपुरवठ्याची समस्या मिटलेली नाही.
मात्र आता हिडकल डॅम येथे नव्याने बसविण्यात येत असलेल्या हाय टेक्नॉलॉजी वॉटर पंपिंग मशिनरीमुळे बेळगाव शहराचा पाण्याचा प्रश्न निकालात निघेल, असे सांगितले जात आहे.