अवयवदान हा या शतकातील एक वैद्यकीय चमत्कार असून केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये अवयव प्रत्यारोपणाच्या अवघड शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक अद्ययावत वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध आहेत, अशी माहिती केएलई अकॅडमी ऑफ ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चचे रजिस्ट्रार डॉ. व्ही. ए. कोठीवाले यांनी दिली.
मुंबई येथील फेडरेशन ऑफ बाॅडी अॅन्ड ऑर्गण डोनेशनच्या नाशिक ते बेळगाव या 775 कि. मी. अंतराच्या अवयवदान जनजागृती पदयात्रेची नुकतीच केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल येथे सांगता झाली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने डॉ. कोठीवाले बोलत होते. ते पुढे म्हणाले की अवयवदानाची संकल्पना भारतामध्ये हे अद्याप रुजलेली नाही. जगातील सरासरी एक कोटी लोकांपैकी स्पेनमध्ये 32% तर अमेरिकेमध्ये 28 टक्के लोक अवयवदान करतात. याउलट भारतात ही टक्केवारी अवघी 8 टक्के इतकी आहे, असे सांगून एखाद्याचे प्राण वाचू शकणाऱ्या अवयवदानाच्या चळवळीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. कोठीवाले यांनी केले.
तामिळनाडू राज्याने अवयव दानासंदर्भात देशात सर्वाधिक पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले. मृत्यूनंतर आपण आपले शरीर पुरतो किंवा जाळतो आपली शरीरे नष्ट करून आपण काय साध्य करतो. त्यापेक्षा आपले शरीर अथवा अवयव मनुष्यच्या कल्याणासाठी उपयोगी पडत असेल तर त्यासारखे पुण्य नाही असे सांगून अवयव दानाचा संदर्भात समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती करणाऱ्या फेडरेशन ऑफ बाॅडी अॅन्ड ऑर्गण डोनेशनच्या सर्व सदस्यांचे डॉ. ए. व्ही. कोठीवाले यांनी अभिनंदन केले.
सध्या डायलिसिसवर असलेल्या 2 लाखाहून अधिक लोकांना मूत्रपिंडाची अर्थात किडनीची गरज आहे. त्याचप्रमाणे जवळपास 50 हजार हृदय आणि यकृत (लिव्हर) विकारग्रस्त रुग्ण प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असल्याची माहितीही डॉ. कोठीवाले यांनी दिली. यावेळी डॉ. राजेश पोवार केली डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल तर्फे राबविण्यात येत असलेल्या अवयवदान चळवळी संदर्भात माहिती दिली. हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर आर. एस. मुधळ यांनी वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अवयव दान चळवळ अधिक विस्तृत करण्यासाठी सहकार्य करण्याची गरज असल्याचे सांगितले.