नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी बेळगाव शहरातील मटण दुकाने दररोज सायंकाळी सहा ऐवजी सात साडेसात वाजता बंद केली जावीत अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. तसेच मटण दुकानदार संघटनेने ही मागणी मान्य न केल्यास त्यांच्या विरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बेळगाव शहरातील मटण दुकानदार संघटनेने पंधरा दिवसापूर्वी शहरातील सर्व मटण दुकाने सायंकाळी 6 वाजता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता दररोज सायंकाळी 6 वाजता गावातील मटण दुकाने बंद होत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. शहरातील नागरिक दिवसभर आपापल्या कामात व्यस्त असतात. यापैकी कांहीजण कामासाठी सरकारी अथवा खाजगी कार्यालयांना जातात शिक्षकी पेशा असणारे शाळा – महाविद्यालयात जातात तर मोलमजुरी करणारे दिवसभर आपल्या कामात व्यस्त असतात.
ही सर्व मंडळी सायंकाळी 5.30 – 6 नंतरच आपल्या कामातून मोकळी होत असतात. कामगार मजूर मंडळी सायंकाळी घरी जाताना रोजंदारीवर मिळालेल्या पैशातून मटण खरेदी करून घरी घेऊन जात असतात. कार्यालयातून परतल्यानंतर बाजारहाट करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या मंडळींना मटण घ्यावयाचे झाल्यास नेमकी 6 वाजता सर्व मटण दुकाने बंद होत आहेत. ही दुकाने सहा वाजता बंद होत असल्यामुळे हातातील काम बाजूला ठेवून नागरिकांना मटण दुकानाकडे धाव घ्यावी लागत आहे.
एकंदर सायंकाळी 6 वाजता मटण दुकाने बंद करण्याचा निर्णय हा अत्यंत चुकीचा आहे. यामुळे मांसाहारी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. यासाठी मटण दुकाने बंद करण्याच्या वेळेत बदल करावा आणि सदर दुकाने सायंकाळी किमान 7 – 7.30 वाजेपर्यंत उघडी ठेवावीत, जेणेकरून मटण खरेदी करू इच्छिणाऱ्या नागरिकांची सोय होऊ शकेल. मटण दुकाने सायंकाळी लवकर बंद होत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय तर होतच आहे, शिवाय शहरातील बहुतांश मटण दुकानदारांच्या व्यवसायावरही परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.
तेंव्हा शहरातील मटण दुकानदार संघटनेने याची गांभीर्याने दखल घेऊन मटण दुकाने उघडी ठेवण्याचा कालावधी तात्काळ सायंकाळी 7 ते 7.30 वाजेपर्यंत वाढवावा अन्यथा त्यांच्याविरोधात न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे ॲड. मारुती कामाणाचे यांनी बेळगाव लाइव्हशी बोलताना सांगितले.