Saturday, November 23, 2024

/

‘नारळ फुटला…. धुळळा उडाला’

 belgaum

उचगाव क्रॉस ते उचगाव गावापर्यन्तच्या रस्त्याचे उद्घाटन करून तब्बल महिनाभर उलटला असला तरी या कामाला चालना देण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मागील महिन्याच्या आधी एका लोकप्रतिनिधीने या रस्ते कामाचा नारळ फोडला मात्र रस्ता कधी होणार असा सवाल सध्या उपस्थित करण्यात येत आहे.

रस्त्याचा नारळ फुटला असला तरी कामांना सुरुवात न झाल्याने रस्त्यावरील धूळ मोठ्या प्रमाणात उडत आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे रस्त्याचा नारळ फुटला आणि धुरळा उडाला अशी अवस्था सध्या या रस्त्याची झाली आहे. याचा गांभीर्याने विचार करून संबंधित लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

उचगाव येथे मळेकरणी देवीची यात्रा दर मंगळवारी आणि शुक्रवारी मोठ्या प्रमाणात भरते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येजा करत असल्याने त्यांना रस्त्यामुळे नाहक त्रास होत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातच मोठ्या प्रमाणात धूळही उडत असल्याने अपघात घडत असल्याच्या घटना ही उघडकीस येत आहेत. त्यामुळे यापुढे तरी या रस्त्याचे काम तातडीने करावे अशी मागणी होत आहे.

तालुक्यातील मोठेगाव म्हणून उचगावकडे पाहिले जाते. मात्र उचगाव क्रॉसपासून उचगाव गावापर्यंत रस्ता खराब झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित लोकप्रतिनिधी नारळ कशासाठी फोडला? जर रस्त्याचे काम सुरू करायचे नव्हते तर नारळ फोडून नागरिकांची दिशाभूल कशा साठी केली? यापुढे असे प्रकार करण्यापूर्वी रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी आणि त्यानंतरच नारळ फोडावा अशी चर्चा जोरदार सुरू आहे. यापुढे तरी संबंधितांणी या रस्त्याचे काम सुरु करावे, अशी मागणी होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.