बसवान गल्ली, बेळगाव येथील एका घरासमोरील गेले 6 महिने फुटलेल्या अवस्थेत असलेल्या पाण्याच्या पाईप पाईपमधून दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. तथापी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बसवान गल्ली बेळगाव येथील घर नंबर 1367 या घरासमोरील पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन गेल्या सहा महिन्यापासून फुटली असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या फुटलेल्या पाईपलाइनबाबत स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या संबंधित वार्ड ऑफिसला वेळोवेळी माहिती देऊन तक्रार केली आहे. मात्र गेल्या 6 महिन्यात नागरिकांच्या या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही. परिणामी फुटलेल्या पाईपलाईन मधून दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.
सध्याच्या घडीला भारतासह जगभरात पाणी संवर्धनाबाबत जनजागृती केली जात आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. पाणी आडवा पाणी जिरवा हा संदेश दिला जात आहे. एकंदर पाणी संवर्धनाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.
बसवान गल्ली, बेळगाव येथे पिण्याच्या पाण्याचा गेल्या 6 महिन्यापासून सुरू असलेला अपव्यय पाहता बेळगाव महानगरपालिकेला पाणी संवर्धनाच्या मोहीमेशी काही देणे – घेणे नसल्याचे दिसून येत आहे. उन्हाळा जवळ येत असताना अशाप्रकारे पाण्याचा अपव्यय उचित नसल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. तरी महापालिका आयुक्तांनी बसवान गल्ली येथील पिण्याच्या पाण्याच्या अपव्ययाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगली समज द्यावी, तसेच बसवान गल्ली येथील पाईपलाईन युद्धपातळीवर दुरुस्त करण्याचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी होत आहे.