स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुमारे 7 कोटी रुपये खर्चून कोटेकेरी तलाव अर्थात किल्ला तलावाचा दोन टप्प्यात विकास केला जाणार आहे. या विकास कामाचे कंत्राट अनुक्रमे समीर शिरगुप्पी (क्लासिक ट्रेडर्स) आणि बिल्लीबाटलू हेंजा रेड्डी, कृष्णा रेड्डी (सौहार्ध इन्फ्रा- टेक प्रा. लि.) यांना देण्यात आले आहे.
बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने निविदा काढून पहिल्या टप्प्यातील विकास कामांचे कंत्राट क्लासिक ट्रेडर्स (2 कोटी 57 लाख 94 हजार 647.13 रु.) आणि दुसऱ्या टप्प्यातील विकास कामाचे कंत्राट सौहार्ध इन्फ्रा- टेक प्रायव्हेट लिमिटेड (4 कोटी 50 लाख 03 हजार 303.1 रु.) यांना दिले आहे. किल्ला तलाव विकास कामाची वर्कऑर्डर मिळाल्यानंतर पुढील 9 महिन्यात सर्व कामे पूर्ण करावयाची आहेत. सध्या वर्कऑर्डर देण्यात आले असून आठवड्याभरात कामाला प्रारंभ होणार आहे.
किल्ला तलावाची विकास कामे दोन टप्प्यात पूर्ण केली जाणार असून यापैकी पहिल्या टप्प्यात एम. एस. गेट, गार्ड अँड स्टोअर रूम, गाझेबो, किओस्क, घाट, जेट्टी, हार्डस्कॅप वर्क, बेंचेस, डस्टबिन, रेट्रोरिफ्लेक्टर्स, साईन बोर्ड, बाह्य विद्युत जोडणी आदी कामांचा समावेश असणार आहे.
त्याचप्रमाणे दुसऱ्या टप्प्यात धबधबा व कॅसाकेड, टॉयलेट ब्लॉक, लँडस्केप / बागायत काम, नागरी आरोग्य अभियांत्रिकी कामे, विद्युत रोषणाई, धबधबा व कॅसाकेडसाठी विद्युतीकरणाचे कामे आदी कामांचा समावेश असणार आहे.