मागील कित्येक वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचे आणि श्रेयवादावरून दोनदा उदघाटन झालेल्या रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे केवळ आपल्या बडेजावसाठी एका लोकप्रतिनिधीने अशा उचापती करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विकासापेक्षा स्वतःचे प्रतिबिंब उमटविण्यात धन्यता मानत येत आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामीण भागात मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी एका लोकप्रतिनिधीने श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला आहे. तसे पाहता नागरिकांनी आंदोलन छेडून या रस्त्यासाठी जोरदार रास्ता रोको ही केला होता. मात्र आता श्रेय लाटून घेण्यासाठी एका लोकप्रतिनिधीने आपल्यात हा रस्ता मंजूर केल्याचा आव आणत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यापुढे तरी अशा लोकप्रतिनिधीने श्रेय लागण्यापेक्षा नागरिकांची सेवा करण्यावरच भर द्यावा अशी मागणी होत आहे.
सध्या श्रेयवादात हा रस्ता प्रलंबित ठेवण्यात येत आहे. या रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत अनेक अपघात घडत आहेत. मात्र याचे सोयरसुतक संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना नसल्याचे दिसून येत आहे. विशेष करून स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू झालेल्या या रस्त्याचे काम एका लोकप्रतिनिधीने आपणच हा निधी मंजूर करून आणला आहे असे सांगून लोकांची दिशाभूल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या रस्त्याबाबत ज्यांनी खरंच आंदोलन केले आहे, त्यांचा आता विरोध होऊ लागला आहे.
विशेष म्हणजे ज्यांनी आंदोलन छेडून हा रस्ता करावा यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत, त्यांना बाजूला सारून एका लोकप्रतिनिधीने स्वतः उदघाटन केले. मात्र नागरिकांनी याला विरोध करून संबंधित नागरिकांकरिता या रस्त्याचे उद्घाटन करून त्या लोकप्रतिनिधीला चपराक दिली आहे. विशेष म्हणजे स्वतःच्याच कंत्राटदारांना कामे देऊन बक्कळ माया जमा होणाऱ्या त्या लोकप्रतिनिधीला सध्या चाप बसण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.