गेल्या आठवडा भरापासून प्रसिद्धीच्या झोतात असलेले गोकाक चे आमदार रमेश जारकीहोळी यांनी नवीन वक्तव्य करून बेळगावच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
आजही सिद्धरामय्या हेच माझे नेते आहेत.आणि हे जाहीरपणे सांगण्यासाठी मला कोणाचीही भीती नाही .मी आत्ता भाजपमध्ये आहे.त्यामुळे माझी पक्षीय निष्ठा भाजपशी आहे.पण माझी वैयक्तिक निष्ठा कायम सिद्धारामय्या यांच्याशीच आहे असे विधान आमदार रमेश जारकीहोळी यांनी करून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.
बेंचिनमर्डी येथे सत्कार प्रसंगी त्यांनी हे उदगार काढले आहेत.आता त्यांच्या या उदगाराची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. सिद्धरामय्या हे चांगले व्यक्ती आहे.आम्ही दोघे वेगवेगळ्या पक्षात आहोत हे दुर्दैव.असे असले तरी आजही ते माझे नेते आहेत.आता राजकारणात पुढे काय होते बघू असे म्हणून आमदार रमेश जारकीहोळी यांनी नवा बॉम्ब टाकला आहे.
मागच्या सरकारमध्ये मी मंत्री होतो.चांगले खातेही माझ्याकडे होते.मी बंडाचे निशाण उभारल्यावर सिद्धरामय्या यांनी मला चार बुद्धीच्या गोष्टी सांगितल्या.पण मी जर माघार घेतली असती तर पक्षातील कुटील लोक आमचा अवमान करून बंडाचे खापर सिद्धरामय्या यांच्यावर फोडले असते.
मैत्री सरकार मी मंत्री होण्यासाठी पाडवले नाही.मला वाईट प्रशासन व्यवस्था आणि दुष्ट लोकांना अद्दल घडवायची होती.गोकाक पोट निवडणुकीत विरोधकांनी सगळे वाईट मार्ग अवलंबले पण त्याचा काही उपयोग झाला नाही असेही रमेश जारकीहोळी म्हणाले.