गेल्या महिन्यात झालेला श्रद्धा परशुराम मावरकर या मुलीचा मृत्यू म्हणजे खुनाचा प्रकार असून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा खून झाला असल्याचा आरोप जीवनमुखी फाउंडेशन बेळगावचे सचिव किरण कुमार पाटील यांनी केला आहे. तसेच संबंधित डॉक्टरांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी शनिवार दि 25 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहितीही पाटील यांनी दिली.
कन्नड साहित्य भवन येथे आज शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये किरणकुमार पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले की, श्रद्धा मावळकर (वय 9 वर्षे, रा. गोकाक) या मुलीला गेल्या 20 डिसेंबर 2019 रोजी टॉन्सिल्सच्या शस्त्रक्रियेसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 डिसेंबर रोजी शस्त्रक्रियेप्रसंगी प्रमाणाबाहेर भूल (ऍनेस्थेशिया) देण्यात आल्यामुळे श्रद्धाची प्रकृती अस्वस्थ झाली. मात्र याची माहिती न देता बीम्सच्या डॉक्टरांनी तिला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. तसेच तातडीने पुढील उपचाराची तजवीज करण्याऐवजी एक दिवस हॉस्पिटलमध्येच ठेवून घेतले. त्यानंतर ऐनवेळी गंभीर अवस्थेतील श्रद्धाला नजीकच्या केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल करा असे सुचवण्याऐवजी संबंधित डॉक्टरांनी तिला हुबळीच्या किम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. यावरून गोंधळ निर्माण होऊन उपचारास विलंब झाल्याने 23 डिसेंबर रोजी रात्री श्रद्धाचा मृत्यू झाला.
बीम्सचे डॉक्टर व भूलतज्ञाच्या हलगर्जीपणामुळेच श्रद्धाचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्याच दिवशी संतप्त पालक व हितचिंतकांनी यासंदर्भात संबंधित डॉक्टरला जाब विचारून त्यांच्याविरुद्ध वरिष्ठ पातळीवर तक्रार केली. त्यावेळी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित डॉक्टरांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल असे आश्वासन वरिष्ठांकडून देण्यात आले. तथापि आता एक महिना उलटून गेला तरी संबंधित डॉक्टरांवर कारवाई झालेली नसल्यामुळे नाईलाजाने आम्हाला 25 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन छेडावे लागत असल्याचे किरण कुमार पाटील यांनी सांगितले. त्याचप्रमाणे दिवंगत श्रद्धाच्या स्मरणार्थ याच दिवशी दि. 25 जानेवारी रोजी सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत मेणबत्ती फेरी काढण्यात येणार असल्याची माहितीही पाटील यांनी दिली. कन्नड साहित्य भवनमधील पत्रकार परिषदेस श्रद्धाचे आईवडिल आणि जीवनमुखी फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.