विमानतळाच्या उभारणीसाठी गावातील शेतकऱ्यांनी 800 एकरहून अधिक पिकावू जमीन गमावली आहे. भूमीपुत्रांच्या त्यागाची जाणीव ठेवून बेळगावच्या विमानतळाला ‘सांबरा विमानतळ’ असे नाव देण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन सांबरा कुस्तीगिर संघटनेच्यावतीने आज मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
विमानतळ निर्माण करताना आणि विस्तारीकरण करताना सांबरा गावातील 800 एकर शेती जमीन संपादित करण्यात आली. गावाच्या या योगदानाची दखल घेऊन ‘सांबरा विमानतळ’ असे नाव विमानतळाला देण्याची मागणी करण्यात आली आहे. नामांतर करताना स्वातंत्र्य सैनिक अथवा राष्ट्रपुरुषाचे नाव दिल्यास त्याबरोबर ‘सांबरा’ हे नाव न टाळता जोडण्यात यावे.
वायुसेना प्रशिक्षण केंद्राच्या नावातही ‘सांबरा’ नाव जोडण्यात यावे. पुराच्या पाण्यात वाहून गेलेला शिवारातील रस्ता करण्यात यावा तसेच स्मशानभूमीच्या 3 एकर राखीव जागेत खेळाचे मैदान बनवण्यासाठी निधी उपलब्ध करावा अशीही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी लक्ष्मण सुळेभावी,यल्लाप्पा हरजी, नितीन चिंगळी, भरमा चिंगळी, महेंद्र गोठे, कृष्णा जोई, भुजंग गिरमल, मोहन हरजी, महेश जत्राटी आदी उपस्थित होते.