सध्या देशभर गाजत असलेला ऐतिहासिक ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट मराठा मंडळ शिक्षण संस्थेने अभिनव पध्दतीने सामुहीकरित्या पाहिला. स्वरूप चित्रपटगृहातील 26 जानेवारी 2020 रोजी रात्रीच्या खेळाला संस्थेच्या अध्यक्षा सौ. राजश्रीताई नागराजू ( हलगेकर) यांच्यासह मराठा मंडळ शिक्षण संस्थेतील विविध शाळा व महाविद्यालयात कार्य करणाऱ्या कर्मचारी, प्राचार्य व संस्थेचे संचालक मंडळ मराठमोळ्या वेशात उस्फुर्त हजेरी लावली. तसेच नरवीर तानाजींच्या अनोख्या शौर्याला घोषणांची मानवंदना देत जाज्वल इतिहासाची ओळख करुन घेतली.
प्रारंभी मंडळाच्या अध्यक्षा, संचालक मंडळाचे सदस्य व कर्मचारी येथील धर्मवीर संभाजी उद्यानात सायंकाळी ठीक 8 वाजता एकत्रित आले. त्याठिकाणी शुभ्र पांढऱ्या गणवेषात आलेल्या या मराठा मंडळाच्या मावळ्यांनी पांढऱ्या रंगाचा फेटा परिधान करून कपाळावर ठळक असा ‘केशरी गंध’ लावून सर्वांचे लक्ष आकर्षित करत एसपीएम रोड ते ‘स्वरूप’ चित्रपट गृहांपर्यंत पायी चालत इतिहासकालीन घोषणा देत सारा परिसर दणाणून सोडला. “हर हर महादेव “! ही घोषणा देत साऱ्यांनी चित्रपटगृहात प्रवेश केला. नरवीर तान्हाजी मालुसरे यांची ऐतिहासिक व्यक्तिरेखा व गाजवलेले अकल्पनीय शौर्य मराठा मंडळाच्या या तानाजी भक्तांनी समजावून घेतले.
प्रचंड साहसाच्या जोरावर रात्रीच्या गडद अंधारात दोरखंडाच्या सहाय्याने नरवीर तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला कसा सर केला आणि शत्रूवर सिंहा सारखे कसे तुटून पडले व प्राणाची बाजी लावून कसे वीर मरण पत्करले. हा रोमांचकारी इतिहास अजय देवगन व काजोल यांच्या समृद्ध अभिनयातून समजावून घेत घोषणा देत मराठ्यांचा इतिहास प्रेरक वातावरण निर्माण करून चित्रपट पाहण्याचा आनंद द्विगुणित केला. याप्रसंगी मंडळाचे मातृमागंल्य आदरणीय पद्मजादेवी हलगेकर, संचालक लक्ष्मणराव सैनूचे, शिवाजीराव पाटील, लक्ष्मीबाई चोळेकर, मलप्रभा शिंदे, विनायक घसारी, ट्रस्ट बोर्ड सदस्य दिनकरराव ओऊळकर, रामचंद्रराव मोदगेकर व कर्मचारी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.
मराठा मंडळ ही सामाजिक बांधिलकी जपणारी बेळगावातील अग्रगण्य शिक्षण संस्था आहे. अनेक समाजाभिमुख उपक्रम राबवून या संस्थेने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. आजवर या संस्थेच्या अनेक विधायक उपक्रमांची नोंद” गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये झाली आहे. या शिक्षण संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या कृतीतून सामाजिक ‘जाण’ दिसून येते. शिक्षण संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा सौ. राजश्री नागराजू (हलगेकर) यांच्या दूरदृष्टीतून व शिस्तबद्ध नियोजनातून संस्थेने हाती घेतलेल्या अनेक गोष्टी इतरांसाठी आदर्श बनल्या आहेत.