कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर गेल्या मंगळवारी कोल्हापूर पोलिसांशी झालेल्या चकमकीत राजस्थानच्या तिघा मोस्ट वॉंटेड गुंडापैकी दोघे जण गोळीबारात जखमी झाले. या घटनेमुळे दोन राज्यांच्या सीमेवर असणारे बेळगाव हे शहर आता आंतरराज्य गुंडांसाठी देशभरात अवैध धंदे करण्यासाठीचे सुरक्षित आश्रयस्थान बनले असल्याचे स्पष्ट झाले आहे. तथापि सर्वसामान्य बेळगावकरांच्या दृष्टीने मात्र हा चिंतेचा विषय बनला आहे.
गेल्या मंगळवारी कोल्हापूर पोलिसांशी झालेल्या चकमकीत जखमी झालेल्या गुंडांची नावे शामलाल गोवर्धन राम (वय 23) आणि श्रावणकुमार विष्णोई (वय 24) अशी असून ते मूळचे जोधपुर – राजस्थानचे रहिवासी आहेत. या दोघांवर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या दोघांसोबत कारमधून प्रवास करणाऱ्या आणखी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुंडांशी झालेल्या चकमकीत पांडुरंग पाटील हा पोलीस कॉन्स्टेबल देखील जखमी झाला आहे.
महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजस्थान येथील कुप्रसिद्ध गुंड कार गाडीने बेळगावहून कोल्हापूरच्या दिशेने निघाले असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना खबऱ्याकडून मिळताच त्यांनी सापळा रचला. किणी गावानजीकच्या टोल नाक्यावर पोलिसांनी गुंडांची कार अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. परिणामी कोल्हापूर पोलीसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. या वेळी झालेल्या चकमकीत दोन गुंड जखमी झाले आणि तिसऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे राजस्थान पोलीस देखील गुंडांच्या या त्रिकुटाच्या मागावर होते. तथापि त्यांच्या आधी कोल्हापूर पोलिसांनी संबंधित गुंडाना सापळा रचून गजाआड केले.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, गुंडांचे हे कुविख्यात त्रिकूट गेल्या 31 डिसेंबर रोजी राजस्थानमधून कर्नाटकात पळाले होते, आणि तेंव्हापासून ते हुबळी येथे दडून बसले होते. आपल्या परिचयाच्या व्यक्तींना भेटण्यासाठी हे त्रिकूट वारंवार बेळगावला भेट देत होते असे सध्या सुरू असलेल्या पोलीस तपासात उघडकीस आले आहे. कोल्हापूर पोलिसांना या गुंडांच्या हालचालीची टीप मिळाली आणि त्यांनी तातडीने पावले उचलून त्यांना जाळ्यात पकडले.
तसे पाहता कर्नाटकाबाहेरील कुविख्यात गुंडांनी बेळगावातील गुंडांशी संपर्क ठेवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2001 मध्ये बेळगावचा कुप्रसिद्ध गॅंगस्टर गजानन हिरोजी आणि मुन्नासिंग पोतीवाला हे दोघे संजय नेसरीकर यांच्याशी झालेल्या गॅंगवाॅरमध्ये ठार झाले होते हिरोजी हा बेंगलोरचा अंडरवर्ल्ड डॉन क्रिस्तोफर चक्रवर्ती उर्फ चक्रा याचा निकटवर्तीय समजला जात होता. गॅंगवाॅरच्या या घटनेनंतर बेंगलोर मधील अनेक कुविख्यात गॅंगस्टर गजानन हिरोजी याच्या बेळगाव येथील अंत्यसंस्काराप्रसंगी उपस्थित होते. तसेच या गॅंगस्टर्सनी संजय नेसरीकर याला यमसदनी धाडून हिरोजी याच्या मृत्यूचा बदला घेण्याचा निर्धार त्यावेळी व्यक्त केला होता. तथापि कालांतराने बेळगाव पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये संजय नेसरीकर ठार झाला आणि त्याला ठार मारण्याचे संबंधित गॅंगस्टर मंडळींचे स्वप्न अधुरे राहिले. बेंगलोरचा आणखी एक कुविख्यात गुंड साधू शेट्टी याचेदेखील बेळगावातील गुंडांची लागेबांधे असून त्याचे वारंवार बेळगावला येणे-जाणे होत असल्याचे समजते.
2003 साली ठाणे (महाराष्ट्र) येथील मोस्ट वॉन्टेड गॅंगस्टर सुरेश मंचेकर हा गेल्या कांही वर्षापासून बेळगावात वास्तव्यास असून तो महापालिकेच्या निवडणुकीद्वारे स्थानिक राजकारणात सक्रिय होणार असल्याची कुणकुण मुंबई पोलिसांना लागली. तेंव्हा मुंबई पोलीसांनी तातडीने हालचाल करून मंचेकरचा बेळगावातील ठावठिकाणा शोधून काढला. त्यानंतर कोल्हापूर येथे झालेल्या पोलिस एन्काऊंटरमध्ये सुरेश मंचेकर ठार झाला. खंडणी गोळा करणे, खून आदी विविध 35 गुन्हे सुरेश मंचेकर याच्या नांवावर नोंद होते.
मंचेकरच्या मृत्यूनंतर त्यांची बायको बेळगाव येथून मुंबई येथील आपल्या टोळीची सूत्रे हलवत असल्याची माहिती देखील कांही वर्षांपूर्वी गुप्तचर यंत्रणेकडून मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्याचप्रमाणे मुंबई अंडरवर्ल्डचे डॉन छोटा राजन आणि अरुण गवळी यांच्या सहकाऱ्यांनी कांही वर्षापूर्वी बेळगावात आश्रय घेतला असल्याचा पोलिसांचा कयास आहे.
मुंबई आणि बेंगलोर येथील अंडरवर्ल्डची कुविख्यात मंडळी वेळोवेळी सीमावर्ती भागात असलेल्या बेळगावात आश्रय घेतात हे सर्वश्रूत झालेले असताना आता राजस्थानमधील गुंडांचे देखील बेळगावशी लागेबांधे असल्याचे उघड झाले आहे.
एकंदर राजस्थानमधील गुंडांचा बेळगावशी असलेला संबंध आणि पूर्वातीहास पाहता महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेले बेळगाव शहर हे बेंगलोर, मुंबई आणि आता राजस्थान येथील अंडरवर्ल्डसाठी एक मोक्याचे सुरक्षित आश्रयस्थान बनल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, परराज्यातील नामचीन गुंडांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा बेळगावात राजरोस वावर असताना पोलीस खाते काय करत असते? परराज्यातील कुख्यात गुंड बेळगाव वास्तव्य करून अथवा बेळगाव मार्गे अन्यत्र जात असतात याची माहिती पोलीस गुप्तचर यंत्रणेला मिळत नाही का? परराज्यातील गुंडांचा बेळगावातील वावर जर गुप्तचर यंत्रणेच्या लक्षात येत नसेल तर अशी यंत्रणा काय कामाची? असे प्रश्न सध्या नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. तेंव्हा पोलीस खात्याने याची गंभीर दखल घेऊन बेळगावच्या आश्रयास येणाऱ्या गुंडांची पाळेमुळे खणून काढणे ही काळाची गरज बनली आहे. अन्यथा परराज्यातील अंडरवर्ल्डच्या डॉनकडून धडे घेऊन बेळगावात एखाद्या स्थानिक गुंडाकडून अंडरवर्ल्डचे साम्राज्य निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे बोलले जात आहे.
News courtasy-indian express