आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या बाविसाव्या श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सवास गुरुवारी दुपारी दीड वाजता धर्मवीर संभाजी चौकातून प्रारंभ झाला. इस्कॉन चे ज्येष्ठ संन्याशी परमपूज्य राम गोविंद स्वामी महाराज, प्रभूदानंद सरस्वती स्वामी महाराज, भक्ती रसामृत स्वामी महाराज आणि दयाल चंद्रप्रभू मुंबई यांच्या हस्ते रथाची पूजा करून चालना देण्यात आली
बेळगाव जिल्हा आणि देशाच्या विविध भागातून आलेले इस्कॉनचे हजारो भक्त या रथयात्रेत सहभागी झाले होते
या रथयात्रेच्या प्रारंभी बोलताना भक्ती रसामृत स्वामी महाराजांनी सर्वांचे स्वागत केले आणि ‘जगन्नाथ रथयात्रा महोत्सव हा करोडो वर्षापासून सुरु असलेला उत्सव असून तो इतर सर्वसामान्य उत्सवा सारखा नाही .
शाश्वत राहणाऱ्या या उत्सवात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आज व उद्या इस्कॉन मंदिराच्या पाठीमागे उभारण्यात आलेल्या मंडपात होणाऱ्या विविध सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमाला बेळगावकरांनी सहकुटुंब उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले .याच वेळी राम गोविंद स्वामी बोलताना म्हणाले की, आज वसंत पंचमी असून देशाच्या विविध भागात एकाच वेळी रथयात्रा निघत आहे त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. प्रभूदानंद स्वामी महाराजांनी जगन्नाथ अष्टकम सादर करून रथयात्रा निर्विघ्नपणे पार पाडावी अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.
रथयात्रेच्या निमित्ताने सजविलेल्या रथामध्ये भगवान जगन्नाथ, त्यांचे बंधू बलराम आणि भगिनी सुभद्रा यांचे आर्च विग्रह ठेवलेले होते. प्रथमच जगन्नाथ यांच्या हाती चांदीचे शंख व चक्र आणि बलदेवांच्या हाती गदा व पद्म देण्यात आले होते . दुसऱ्या एका खास रथात इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभूपाद यांचा पुतळा ठेवलेला होता. रथाला जोडलेले दोरखंड ओढत भक्तगण हा रथ संभाजी चौकातून कॉलेज रोड, समादेवि गल्ली, खडेबाजार ,गणपत गल्ली ,मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली, पाटील गल्ली, रेल्वेओव्हर ब्रिजवरून कपिलेश्वर रोड मार्गे खडेबाजार शहापूर, आयुर्वेदिक कॉलेज रोड वरून गोवावेस मार्गे सायंकाळी सहा वाजता टिळकवाडी तील इस्कॉन मंदिराकडे पोहोचला आणि तेथे रथयात्रेची सांगता झाली.
रथयात्रेच्या मार्गावर अनेक ठिकाणी रथयात्रेवर पुष्पवृष्टी केली गेली या रथयात्रेच्या अग्रभागी रंगोली काढणारे पथक होते त्यापाठोपाठ शृंगारलेल्या सुमारे 40 बैलजोड्या, भजन -कीर्तन मध्ये तल्लीन झालेले हजारो भक्त भगवान श्रीकृष्णाचा नामोच्चार करीत पुढे सरकत होते. संत मीरा हायस्कूलचे विद्यार्थी मल्लखांबाची प्रात्यक्षिके आणि दोरीचे खेळ दाखवत होते होनगा इथून आलेल्या पाचवी ते सातवी पर्यंत च्या मुलीचे लेझीम पथक नागरिकांचे लक्ष आकर्षित करून घेत होते
भगवान श्रीकृष्णाच्या लीला सादर करणारे अनेक प्रसंग तसेच रामायणातील अनेक प्रसंग विविध गाड्यांवर सादर केले जात होते.
आज देशाच्या विविध भागात रथयात्रा होत असली तरीही इस्कॉन मध्ये बेळगावच्या रथयात्रेला विशेष महत्त्व आहे. अभूतपूर्व उत्साह असलेली ही रथयात्रा म्हणजे जनतेला दर्शन देण्यासाठी साक्षात भगवंतच रस्त्यावर उतरलेले होते . ठीक ठिकाणी फळे ,सरबत व पाणी वितरण केले जात होते. सायंकाळी इस्कॉन मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस उभारलेल्या विविध स्टॉल्सवर खाद्यपदार्थांची व इस्कॉनच्या विविध उपक्रमांची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात आले आहेत भजन ,प्रवचन ,कीर्तन आणि ज्येष्ठ संन्याशांची प्रवचने व नाट्य लीला झाली त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद झाला . शुक्रवार दि 31 जानेवारी रोजी सायंकाळी 4 नंतर वैष्णव यज्ञ व इतर उपक्रम होतील तसेच रात्री सर्वांना महाप्रसाद होईल या सर्व उपक्रमात जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन इस्कॉन चे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी केले आहे