भूतरामहट्टीनजीक पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कार रस्त्याशेजारील झाडाला धडकून काल रविवारी पहाटे घडलेल्या अपघातातील मृतांची संख्या आता आज सोमवारी 2 झाली आहे.
अपघातातील दुसऱ्या मृताचे नाव ओमकार नारायण बाळेकुंद्री (वय 21, रा. महात्मा फुले रोड शहापूर) असे आहे. नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्याशेजारील झाडावर आदळून पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील भुतरामहट्टीनजीक काल रविवारी पहाटे घडलेल्या भीषण अपघातात 1 जण ठार तर 4 जण गंभीर जखमी झाले होते. अपघात घडल्यानंतर अभिषेक अभिषेक सुभाष धोंगडी (वय 21 रा. महात्मा फुले रोड शहापूर) या दुर्दैवी युवकाचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे कारमधील अन्य चौघा जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
या चौघांपैकी ओमकार नारायण बाळेकुंद्री या गंभीर जखमी युवकाचा आज उपचाराचा फायदा न होता मृत्यू झाला. ओमकार प्रकाश घोलप (वय 19, रा. पिरनवाडी), निकीत किशन परगोल ( वय 19, रा. उद्यमबाग) आणि विनायक सुनील कणेरी (वय 20, रा. शहापूर) अशी अन्य तीन जखमी युवकांची नांवे आहेत. या तिघांवर सध्या इस्पितळात उपचार सुरू आहेत. सदर अपघाताची काकती पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलगी अधिक तपास करीत आहेत.