इदलहोंड (ता. खानापूर) येथील गुंफण सद्भावना मराठी साहित्य संमेलनातील महाराष्ट्रातील साहित्यीक व कवींच्या सहभागाला पोलिसांचा विरोध आणि संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना प्रवेश नाकारणे या पार्श्वभूमीवर इदलहोंड येथे आनंद मेणसे यांच्या अध्यक्षतेखाली सदर संमेलन सुरू झाले आहे.
काल शनिवारपासून या संमेलनाला परवानगी देण्यास पोलिस प्रशासनाने चालढकल सुरू केली होती तथापि रात्री उशिरा गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाच्या आयोजनाला परवानगी देण्यात आली. मात्र त्यानंतर आज रविवार सकाळपासून पोलिसांनी इदलहोंड क्रॉस येथे नाकाबंदी करून महाराष्ट्रातील साहित्यिक आणि कवींना कवींच्या संमेलनातील सहभागावर बंदी घातली होती.
परिणामी सदर संमेलनाच्या सफलते बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तथापि कोणत्याही परिस्थितीत गुंफण सद्भावना साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार आयोजक गुणवंत पाटील यांनी केला होता.
आपल्या निर्धारानुसार गुणवंत पाटील यांनी रविवारी सकाळी बेळगावचे ज्येष्ठ साहित्यिक प्रा आनंद मेणसे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचा शुभारंभ केला आहे. विशेष म्हणजे या संमेलनाला साहित्यप्रेमींचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. सर्व गटातटाचे राजकारण विसरून मराठी भाषिक प्रचंड संख्येने या संमेलनाला उपस्थित राहिले आहेत.