स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत आर. पी. डी. कॉर्नर टिळकवाडी आणि श्री बसवेश्वर सर्कल गोवावेस येथील सिग्नल यंत्रणा आज गुरुवारी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. यामुळे वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
शहरातील बहुतांश चौकांमधी सिग्नल यंत्रणा अलीकडच्या काळात मोडकळीस आली होती. परिणामी संबंधित चौकातील वाहतूक नियंत्रणाचा बोजवारा उडाला होता. तथापि आता स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील 16 ठिकाणी नव्याने सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. टिळकवाडीतील आर.पी.डी. कॉर्नर आणि गोवावेस येथील श्री बसवेश्वर सर्कल येथील सिग्नल यंत्रणा देखील नव्याने बसविण्यात आली आहे.
सदर सिग्नल यंत्रणा आज गुरुवारी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली. या दोन्ही ठिकाणची बंदावस्थेत असलेली सिग्नल यंत्रणा सुरू केली जावी, अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची नागरिकांची मागणी होती.
आता सदर यंत्रणा कार्यान्वित झाल्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसत आहे. तथापि सिग्नल यंत्रणेची अंमलबजावणी होते की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष करून श्री बसवेश्वर सर्कल येथे कायमस्वरूपी रहदारी पोलिसांची नियुक्ती केली जावी, अशी मागणी होत आहे.