Friday, November 15, 2024

/

कर्तव्य, मान आणि साहसाचे एक खुले आव्हान

 belgaum
पुन्हा एकदा महत्त्वाच्या कामासाठी मराठा लाईट इंफंट्री यांच्या बेळगांव येथील रेजिमेंटल सेंटरला भेट देण्याचा योग आला.. परंपरेनुसार यथोचित स्वागत झाले. पाहुणचारात कुठल्याही प्रकारची तडजोड न करता ‘रामराम’ म्हणत मान, सन्मान, इज्जत आणि आदर या शब्दांचा योग्य तो मेळ घालत कडक युनिफॉर्मच्या आतही एक काळीज आहे, हेच तेथला हर एक फौजी आणि अधिकारी जाणवून देत होता.. कडक शिस्तीतही संस्कारमय गुण अंगी बाणवू शकतो हेच येथले ट्रेनिंग शिकवते.. राजमाता जिजाबाईंनी नाही का शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच कडक शिस्तीत वाढवलं? आईची माया आणि बापाचं प्रेमळ दटावणं या माया-ममतेत बाणेदार शिस्तीची मुलं एकवेळ घडणार नाहीत, पण येथल्या ईन्स्ट्रकटर (प्रशिक्षकां) कडून अहोरात्र ९ महिने जी तयारी करून घेतली जाते त्याला खरोखर तोड नाही.. (त्यासाठी नाना पाटेकरांचा प्रहार हा सिनेमा एकदातरी नक्की पहा) या संपूर्ण तयारी पर्वात तावून सलाखून तयार झालेला जवान जेव्हा तुम्ही पहाल ना तेव्हा खरोखर भारतीय लष्कराचा हेवा कराल..
अहो, काय नसतं ते सांगा जवान म्हणून घडवलेल्या या हाडामासाच्या देहात? जेव्हा हे तरुण फक्त भरती होऊन येथे येतात तेव्हा त्यातील बरेचसे तरुण हे कृश, निष्क्रिय, कोणतेही ध्येय समोर नसलेला, जिद्दीचा अभाव असलेला, घाबरट, मेंगळट, गावागावात उनाडक्या (मग त्या राजकीय, सामाजिक, आर्थिक किंवा वैयक्तीक कुठल्याही असोत) करीत फिरणारा, चार पैशासाठी कोणत्याही प्रकारची नोकरी, लाचारी, गुलामी करायला तयार असलेला असा सुमार व्यक्तिमत्वाचा तरणाबांड फक्त सापळा असतो.. पण मात्र एकदाच सुरवातीच्या काही पात्रपरीक्षा पास झाल्यावर मराठा लाईट इंफंट्रीच्या या पवित्र वास्तूच्या प्रांगणात याच तरुणाने पाऊल ठेवले की सुरू होतो तो प्रवास एक मर्दमावळा, रांगडा गडी आणि खरा भारताचा सर्वांगीण नागरिक घडवण्याच्या दिशेने..
Mlirc mestri
दगडातून सुंदर मूर्ती घडवावी तद्वत येथे पुरुषार्थाचा एकेक अध्याय घडवला जातो.. छिन्नीचा कलात्मक घाव जेव्हा चहोअंगाने प्रशिक्षकांकडून कडक शिस्तीत पडतो तेव्हाच या देहाची अप्रतिम सुबक मूर्ती आकार घेऊ लागते.. सगळ्या प्रकारच्या जाणून बुजून बनवलेल्या अडथळ्यांना (Obstacles) रोज अविरत पार पाडणे म्हणजे आयुष्यातील येणाऱ्या एकेका संकटाला हसत हसत सामोरे जाणे हे इथे शिकवले जाते.. वेगवेगळे समूह  करून प्रत्येक समूहामध्ये स्पर्धा लावतांना एकमेकांना सांभाळीत प्रत्येक आव्हान जिंकण्याचे एकीचे बळ येथे शिकवले जाते, बंदुकीसहित प्रत्येक जड सामान उचलून दऱ्या डोंगरे, नदीनाले पार करताना भविष्यातील सुखदुःखाचा प्रत्येक भार कसा उचलावा हे इथे शिकवले जाते, निसर्गाच्या सानिध्यात एकरूप होताना पशुपक्षी, झाडेफुले, दगडधोंडे आणि याच बरोबर आपली माय म्हणजे या भूमीची माती, तिच्या अंगाखांद्यावर खेळत, लोळत तिचे पांग कसे फेडावे हे येथे शिकवले जाते.. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर शिकवतांना शस्त्रास्त्र ही जशी मारण्यासाठी असतात तशीच आयाबहिणींची अब्रुही वाचवण्यासाठी असतात हे इथे शिकवले जाते..
मानेपर्यंत रुळणारे केस वाढवून, झागमाग गॉगल लावून, फाटक्या जीन्स आणि रंगीबेरंगी शर्ट घालून नको त्या पाश्चात्य लोकांचे अनुकरण करण्यापेक्षा कडक इस्त्रीचा नजरेत भरणारा युनिफॉर्म, त्यावर मानाची पदके, छातीवर घराण्याची मान उंचावणाऱ्या नावाची पाटी, ब्रासोने चमकणारा कमरेचा पट्टा, पायात काळे पॉलिश केलेले चामड्याचे व घोड्याचे नाल लावलेले अँकलेट्स शूज, चारी साईडने वस्तऱ्याने मारलेला जोरदार हेअरकट, चेहऱ्यावर ऊन, वारा, पाऊस, सहन करून उमललेले एक प्रभावी तेज, भरदार छाती, धावून धावून आणि अनेक अडथळे पार करून तयार झालेल्या भरगच्च मांड्या व पोटऱ्या, स्फुरण पावणारे बाहू व पोलादी मनगटे आणि सरतेशेवटी या मराठा सैनिकाच्या मस्तकावर मानाची, अभिमानाची अशी तुरा खोवलेली कॅप परिधान करून एक रुबाबदार व्यक्तिमत्व कसे घडवायचे हे इथे शिकवले जाते..
पिज्जा, बर्गर, नूडल्स, हॉटडॉग, चायनीजच्या या परदेशी खाद्यसंस्कृतीत याच भूमितील शेतकऱ्याने पिकवलेल्या अन्नधान्याचा मान कसा ठेवायचा, शरीर कमावण्यासाठी पालेभाज्या, कंदमुळे, डाळी, भाकऱ्या, चपात्या, अंडी, फळे यांनी पोषक आहार द्रव्ये कशी मिळवायची, वेळप्रसंगी जंगलातील कुठली कुठली झाड़पाने, वेली, तसेच जंगली श्वापदे मारून खाऊ शकतो आणि स्वतःला विपरित परिस्थितीतही तग धरून ठेवू शकतो हे इथे शिकवले जाते.. आणि या सगळ्यांनंतर फार फार महत्वाचे शिकवले जाते ते उच्च कोटीचे राष्ट्रप्रेम.. राष्ट्राबद्दलचा मान, सन्मान, स्वाभिमान शिकवतांना या देशीचे नागरिक हे आपले बांधव आहेत आणि त्यांचे रक्षण ही आपली जबाबदारी आहे आणि ती पूर्ण करतांना कोणतीही जात पात, धर्म, मजहब न बघता सर्वधर्म समभाव हाच इथे शिकवला जातो..
इंच इंच भूमी लढतांना, शत्रूला गोळा बारूदने मारतांना शत्रूच्या स्त्रिया, लहान मुले आणि वृद्ध यांना त्रास होणार नाही हाही संस्कार येथेच शिकवला जातो.. किती सुंदर आणि स्वच्छ असे हे मानवतेचे मंदिर आहे ना? जिथे भारताचा जवान घडवता घडवता नकळत एक भावी सृजनशील असा नागरिक घडवला जातो, जो ना की फक्त सीमेवर लढतो तर देशात अंतर्गत कुठलीही समस्या, आणीबाणी अथवा नैसर्गिक आपत्ती उद्भवली तर शस्त्र सोडून याच आपल्या बांधवांसाठी धावत येतो व मदतकार्यात स्वतःला झोकून देतो.. चार दिवसात त्या वास्तूत फिरत असतांना अवतीभवती सगळीकडे जेव्हा ही मुले पहात होतो तेव्हा त्यांचे, वागणे, बोलणे, चालणे हे केवढे शिस्तबद्ध  होते. कुठेही मरगळलेपणा, आळसापणा, नैराश्य, कामचुकारपणा, थकावटपणा याचा लवलेशही जाणवत नव्हता.. मात्र जागोजागी स्फूर्ती, चेतना, सळसळता उत्साह, समाधान, बेधुंद जगण्याचा जल्लोष, खळखळते आनंदाचे झरे, सुसाट वाऱ्याचे खेळकर झोत असेच काहीसे आल्हाददायक वातावरण होते.. खरेच, एक नशा, एक झिंग, जगण्याचे एक वेगळेच तुफानी व्यसन प्रत्येकामध्ये दिसत होते.. ट्रेनिंग घेऊन तयार झालेला जवान तर एवढा उत्साही होता की आता पाठवा कुठेही जगाच्या पाठीवर.. नाही परिस्थितीवर मात करीत विजय संपादन केला तर नाव लावणार नाही गेल्या सत्तर पिढ्यांचं आणि जर जय खेचून आणला तर गेल्या सत्तर पिढ्यांचा असा काही उद्धार करेन की यापुढील जन्माला येणारी प्रत्येक पिढीचं सैन्यात भरती होऊन या देशीचं पांग फेडील.. असाच आवेश प्रत्येकाचा काहीसा दिसत होता..
खरंच लिहितानाही अंगावर काटा आला हो.. मी पाहिली आहेत तिथली काही मुलं ज्यांची आता दुसरी, कुणाची तिसरी तर कुणाची चौथी पिढी या देशासाठी अभिमानाने सैन्यात भरती झाली आहे.. कुठला गाजावाजा नाही, कुठला डामडौल नाही की कुठला बडेजाव नाही.. कुठली जाहिरात नाही की कुठली पोस्टारबाजी बॅनरबाजी नाही..
Mlirc belgaum
जर या भूमीसाठी लढता लढता धारातीर्थी पडलो तर शपथ आहे त्या आईच्या दुधाची, शपथ आहे त्या बहिणीच्या राखीची, शपथ आहे त्या बापाच्या थरथरत्या हाताची आणि शपथ आहे त्या दैवताची छत्रपती शिवरायांची.. गोळी छातीवर झेलेन पण शत्रूला पाठ दाखवणार नाही.. मिरवणूक निघायचीचं असेल तर ती एकदाच निघेल ती ही तिरंग्यात लपेटलेल्या माझ्या सार्थ देहाची.. फक्त पंचक्रोशीचं नाही तर सारा जिल्हा लोटेल माझ्यासाठी.. साऱ्या देशातल्या वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठावर माझा फोटो आणि मी बजावलेल्या कर्तव्य, मान आणि साहसाचा यथोचित उल्लेख असेल.. प्रत्येक डोळ्यात माझ्यासाठी एक अश्रू नक्कीच असेल.. त्यातून कायम तरुणांना देशासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची सातत्याने प्रेरणा मिळावी हाच प्रामाणिक उद्देश असेल. आईबापाच्या पोटी जन्म घेतल्याचे सार्थक असेल आणि त्यांची मान सदैव उंच राहील अशा मुलाच्या कर्तृत्वाचा अभिमान त्यांच्या मुखावर सदैव असेल…
मित्रांनो, जे अनुभवलं, जे पाहिलं ते ते सारे लिहून काढलं.. प्रत्येक भारतीयाला हे मोल कळायलाच हवे की ही गावागावातील आपल्या अवतीभवती लहानाची मोठी होत गेलेली मुलं आपल्या देशातील नागरिकांच्या  सुखासाठी, त्यांच्या रात्रीच्या शांत झोपेसाठी, त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वस्वाचा कसा त्याग करत असतात.. रक्ताचं पाणी करत असतात.. रात्रीचा दिवस करीत असतात, सणासुदीला कुटुंबियांपासून ताटातूट करून उण्या तापमानात प्रत्येक सीमेवर बंदुका घेऊन अविरत जागरण करीत असतात.. मराठा लाईट इंफंट्रीमध्ये आलेला हा स्वानुभव, त्या जाणिवा, दिसत नसला तरी अंतरीचा भावभावनांचा कल्लोळ, ती ऊर्जा, त्यागाची परिसीमा, उच्च कोटीचे समाधान, सार्थ जगण्याचा आनंद, निस्वार्थ सेवेचा जल्लोष आणि संस्कारमय वागणुकीचा एक ओतप्रोत आदर्श.. सगळं सगळं मनापासून मांडलं.. प्रत्येक तरुणाने, प्रत्येक भावाने, प्रत्येक मुलाने, प्रत्येक विध्यार्थ्याने हे नक्की नक्की वाचावे आणि तैसेची आचरण योजावे..  अधिक काय मागावे..
आपला,
अनिल नलावडे
(९८२१५५६४४८)
 belgaum

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.