बेळगाव ए पी एम सी मार्केटला लागलेले ग्रहण कधी सुटताना दिसत नाही आहे कधी व्होलसेल भाजी व्यापाऱ्यांचा तिढा कधी शेतमालाला दर कमी झाल्याने गेट बंद आंदोलन तर कधी हमालांचा बंद असे नेहमीच आंदोलनानी ए पी एम सी चर्चेत आहे.
खरं पाहिलं तर ए पी एम सी सेक्रेटरी आणि संचालक मंडळाने मार्केट यार्डातील समस्या कमी करायला हव्यात मात्र दिवसेंदिवस बेळगाव मार्केट यार्डात समस्या वाढतच आहेत.बुधवारी जरी भारत बंद असला तरी त्याचा फरक शहरात इतर कुठंही दिसला नाही मात्र याचा फरक मार्केट यार्डात जरूर दिसला.आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हमालांनी संप करत काम बंद आंदोलन छडले होते त्यामुळे नेहमी गजबजणारे मार्केट ओसाड पडले होते.
या आहेत हमालांच्या मागण्या
हमालांना घरे बांधून देण्याचे आश्वासन ए पी एम सी ने दिले होते त्याची पूर्तता अद्याप झाली नाही या शिवाय रताळी कांदा आणि बटाट्याची पोती 50 किलो वजनाची करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.शेतकऱ्यांकडून मार्केट मध्ये
कांदा 55 ते 65 किलो पर्यंत बटाटा 55 ते 58 किलो रताळी 65 ते 70 वजनाची पोती आवक होतअसतात त्यामुळे 50 किलो हुन अधिक वजनाची पोती उचलायला अडचण होत असते तर हमाली 50 किलोची वरची मिळत नाही त्याचा फटका हमालांना बसत असतो.केंद्र सरकारच्या नियमानुसार लोडिंग होत नाही असेही हमालांनी म्हटलं आहे.
मार्केट यार्डात मूलभूत सुविधांची वानवा आहे हमालांना दवाखाना नाही या शिवाय टॉयलेट बाथरूम सुविधा करण्यात आलेली नाही याची पूर्तता करावी अशी मागणी करण्यात आली आहे.आगामी 23 जानेवारी रोजी देखील हे हमाल काम बंद आंदोलन करणार आहे.
बंदला अत्यल्प प्रतिसाद
विविध संघटनांनी जाहीर केलेल्या भारत बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला.शहरात नेहमीप्रमाणे सगळे व्यवहार सुरळीत सुरु होते.शाळा,कॉलेज देखील रोजच्या प्रमाणे सुरू होत्या.केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी विविध कामगार संघटनांनी धर्मवीर संभाजी चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला.जिल्हाधिकाऱ्यांना कामगार नेत्यांनी कामगारांच्या मागणीचे निवेदन देऊन कामगार विरोधी कायदा रद्द करा अशी मागणी केली.पोस्ट खात्याच्या कर्मचाऱ्यांनी देखील बेळगाव बंदला पाठिंबा दिला.मुख्य पोस्ट कार्यालयासमोर पोस्ट कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन छेडून आपल्या मागण्या संदर्भात जोरदार घोषणाबाजी केली.शहरातील बाजारपेठ देखील नेहमीप्रमाणे सुरू होती.शहरात अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.