माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी मुलेही देशाची भावी आधारस्तंभ आहेत असे म्हंटले आहे. कोणतीही चांगली गोष्ट मुलांपासून सुरू केली पाहिजे, जगाला शांतीचा संदेश द्यायचा असेल तर त्याची सुरुवात मुलांपासून करा, असे महात्मा गांधीजी म्हणत. मात्र या थोर पुरुषांचे विचार बेळगावात पायदळी तुडवली जात असून ड्रग पेडलर्स अर्थात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांकडून अंमली पदार्थ विक्रीसाठी चक्क शाळा-महाविद्यालयातील मुलांचा वापर केला जात असल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे.
अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या ड्रग पेडलर्सकडून केक, पेस्ट्री अथवा उत्तम खाद्यपदार्थ किंवा अवघे 30 रुपयांचे आमिष दाखवून मुलांचा अंमली पदार्थ विक्रीसाठी वापर केला जात आहे. कोणाला संशय येऊ नये अथवा ओळख पटवता येऊ नये यासाठी मुलांना हाताशी धरले जात आहे. पोलीस खाते अधेमधे अंमली पदार्थ विकणाऱ्या ड्रग पेडलर्सना गजाआड करत असले तरी सध्या हा धंदा तेजीत आहे. एखाद्या अमिष दाखवून मुलांना अंमलीपदार्थ विक्रीच्या जाळ्यात ओढले जात असल्यामुळे ही मुले अंमली पदार्थांच्या आहारी जाऊन ड्रग ॲडिक्ट अर्थात व्यसनाधीन होत आहेत. अमली पदार्थाचे व्यसन लागावे आणि त्यांच्या विक्रीसाठी प्रामुख्याने युवक आणि शाळा-महाविद्यालयातील अल्पयीन मुलांना लक्ष्य केले जात आहे.
अंमली पदार्थ विक्रीच्या जाळ्यात अडकलेली बेळगावातील बहुतांश मुले ही चांगल्या शाळा-कॉलेज आणि व्यावसायिक संस्थांमधील आहेत. शाळा-महाविद्यालयातील ज्येष्ठ मुलांना हाताशी धरून ड्रग पेडलर्स आपले अंमली पदार्थ विक्रीचे जाळे विस्तारत आहेत. शहरातील गर्दीच्या भागातील पानपट्टीची दुकाने दारूची दुकाने आणि बार अशा मोक्याच्या ठिकाणी अंमली पदार्थ विक्रेत्यांकडून छोट्या – छोट्या पाकिटातून मुलांना अंमली पदार्थ विकले जात आहेत. ज्यांचा वापर सिगरेट ओढण्याद्वारे केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सध्या नैसर्गिक सायकोट्राॅफिक पदार्थ आणि रासायनिक घटक असणारे नशिले पदार्थ सेवन करण्याचे प्रस्थ देखील वाढल्याचे उघडकीस आलेल्या काही घटनांमधून दिसून आले आहे. पोलीस खात्याचे औदासिन्य आणि पेडलर्स लोकांचा उत्साह लक्षात घेता आता समाजातील प्रत्येकाने अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत सहभागी होण्याची गरज निर्माण झाली आहे.
बेळगाव शहरात अशा अनेक जागा आहेत की जेथे अंमली पदार्थ विकले जातात आणि त्यांचे सेवन केले जाते. ड्रग पेडलर्स मंडळी अंमली पदार्थ विक्रीची आपली जागा दररोज बदलत असतात, परंतु अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांची ठिकाणे मात्र बदललेली नाहीत. बेळगावातील सरदार हायस्कूल मैदान, अनगोळ, भरतेश शिक्षण संस्थेनजीकचा किल्ला परिसर व भाजी मार्केट, जुना पी. बी. रोड जुने बेळगाव, कॉलेज रोड, गोगटे कॉलेजसमोरील चिंचोळा रस्ता, खंजर गल्ली ही यापैकी कांही ठिकाणे आहेत.
ड्रग अर्थात अंमली पदार्थ उपलब्ध न झाल्यास व्यसनाधीन मुले बाजारात सहजासहजी उपलब्ध असणाऱे कफ सिरप, वेदनाशमक औषधे, ग्लू, पॅन्ट, गॅसोलीन स्वच्छतेसाठी वापरले जाणारे द्रवपदार्थ आदींचा नशेसाठी वापर करताहेत. अवघ्या 12 वर्षाची मुले या पद्धतीने बेभान नशा करत असल्याचे उघडकीस आले आहे. कोवळ्या वयात पालकांकडून प्रेम आणि आणि माया मिळणे, कौटुंबिक समस्या व मानसिक ताण यामुळेच बहुतांश मुले अंमली पदार्थ आणि दारूच्या आहारी गेल्याचे दिसून आले आहे. तेंव्हा पालकांनी वेळीच आपल्या आचरणात बदल करून मुलांची काळजी घेणे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. पोलीस खात्याने देखील शहरातील अमली पदार्थ विक्रेत्यांची पाळेमुळे खणून त्यांना गजाआड केले पाहिजे अन्यथा स्मार्ट बेळगावचा ‘उडता बेळगाव’ होण्यास वेळ लागणार नाही, असे जाणकारांचे मत आहे.