कर्नाटकातील कन्नडिगांच्या कृतीला प्रत्युत्तर देताना शिवसेनेकडून महाराष्ट्रातील कन्नड भाषिकांना लक्ष्य केले जात आहे. कन्नड भाषिकांना अशाप्रकारे त्रास दिला गेल्यास कर्नाटक सरकार कदापी गप्प बसणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी महाराष्ट्र सरकारला दिला आहे.
बेंगलोर येथे रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी हा इशारा दिला. मूळचे बेळगाव जिल्ह्यातील अथणीचे रहिवासी असणारे उपमुख्यमंत्री सवदी पुढे म्हणाले की, कन्नडिग आणि कर्नाटक सरकारची मालमत्ता यांना महाराष्ट्रात लक्ष्य केले जात आहे. तसेच महाराष्ट्रात राहणाऱ्या कन्नडिगांना कर्नाटकातील मराठी भाषिकांना त्रास झाला तर बघा! असे धमकावले जात आहे. मराठी भाषिकांसह कर्नाटक राज्यातील समस्त जनतेला कन्नडिग म्हणूनच वागविले जाते, त्यांच्या हक्काचे रक्षण केले जात आहे.
तथापि शिवसेनेच्या कृतीला येथील कन्नड संघटना प्रत्युत्तर देत आहेत. महाराष्ट्रात कन्नडिगांना त्रास दिला गेला तर कर्नाटक सरकार त्याची गंभीर दखल घेईल. तेंव्हा महाराष्ट्र सरकारने त्वरित कार्यवाही करून कन्नडिगांना त्रास देण्याच्या प्रकारांना आळा घालावा असे सवदी म्हणाले.
कोल्हापुरात अलीकडेच कन्नड नेता भीमाशंकर पाटील व कर्नाटकाचा ध्वज जाळण्यात आला. त्याच्या प्रत्युत्तरादाखल कन्नड संघटनांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकृतीचे दहन केले, असेही उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी स्पष्ट केले.