मोफत आणि त्वरेने न्याय मिळावा यासाठी दरवर्षी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले जात असते. बेळगाव जिल्ह्यातील यंदाची पहिली राष्ट्रीय लोक अदालत शनिवार दि. 8 फेब्रुवारी रोजी भरविण्यात येणार असून या अदालतीचा प्रलंबित खटलेधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सचिव विजय देवराज अरस यांनी केले आहे.
विनाशुल्क व तातडीने न्याय मिळावा यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले जाते. यंदा अशा 5 लोक अदालती भरविण्यात येणार आहेत. कामगार खटले, चेक बाउन्स, पैशाची वसुली, विद्युत व पाणी बिले, कौटुंबिक वाद, फौजदारी खटले नुकसानभरपाईचे खटले या लोक अदालतीमध्ये निकालात काढले जाणार आहेत. बेळगांव न्यायालयाबरोबरच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये असलेल्या न्यायालयांमध्ये हि लोक अदालत भरविली जाणार आहे.
वादी – प्रतिवादींना समोरासमोर बसून न्यायाधीशांसमोर कोणावरही जबरदस्ती किंवा दडपण न घालता लोक अदालतीमध्ये खटले निकालात काढले जातात. विशेष म्हणजे यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तसेच याठिकाणी खटल्याचा निकाल लागल्यानंतर त्याच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाखेरीज अन्य कोणत्याच वरिष्ठ न्यायालयाकडे अपीलसुद्धा करता येत नाही. तेंव्हा वादी – प्रतिवादी या दोघांसाठी लोक अदालत फायदेशीर असल्याचे विजय देवराज अरस यांनी स्पष्ट केले असून येत्या 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्ह्यातील पहिल्या लोक अदालतीचा जनतेने लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.