बेळगावात मराठी साहित्य संमेलनांची होणारी गळचेपी पोलिसांची दडपशाही आणि कानडी संघटनांचा तानाजी चित्रपटाला होणारा विरोधाच्या पाश्वभूमीवर बेळगावातील पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत.
रविवारी पोलिसी दडपशाहीने बेळगावतील कुद्रेमानी आणि इदलहोंड या दोन्ही साहित्य संमेलनात नेहमी प्रमाणे सीमा प्रश्नाचा ठराव होऊ शकला नाही मात्र याचे पडसाद उस्मानाबाद येथील संमेलनात उमटले.
93 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात बेळगाव सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना धमकी देणाऱ्या कर्नाटक नवनिर्माण सेनेचा. आणि मराठी साहित्य संमेलनावर बंदी घालणाऱ्या कर्नाटक सरकारच्या निषेधाचा ठराव हा एकमताने मंजूर करण्यात आला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाचा कार्यक्रम उस्मानाबाद येथे सुरू झाला आहे. या संमेलनाच्या समारोपाच्या व खुल्या अधिवेशनात एकूण वीस ठराव मांडण्यात येत आहेत. यामध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रदेशात मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना धमकी देणाऱ्या कर्नाटक नवनिर्माण सेनेचा निषेध करणारा ठराव मांडण्यात आला. यासाठी प्रकाश पायगुडे हे सुचक होते. तर रमेश वसकर यांनी अनुमोदन दिले.
याशिवाय सीमावासीय मराठी भाषेच्या सीमेवरचे रक्षक आहेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती जपत आहेत. सीमा भागात संमेलनं घेऊन ते माय मराठीचा जागर करीत आहे. परंतु शनिवारी कर्नाटक सरकारने सीमाभागात मराठी साहित्य संमेलन भरवण्यात बंदी घातली. मराठी भाषेवर संस्कृतीवर कर्नाटक सरकारने दडपशाहीचा घाला घालत असल्याचा आरोप करीत. कर्नाटक सरकारचा निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावासाठी डॉ. दादा गोरे हे सुचक होते. तर रवींद्र केसकर यांनी ठरावास अनुमोदन दिले.