बेळगावच्या सांबरा विमानतळाचे नाव बदलून ते ‘वीर राणी कित्तूर चन्नम्मा विमानतळ’ असे केले जावे, अशी विनंती केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री सुरेश अंगडी यांनी एका पत्राद्वारे जिल्हाधिकारी एस. बी. बोमनहळ्ळी यांना केली आहे.
बेळगाव विमानतळ हे राज्यातील सर्वात जुन्या विमानतळांपैकी एक असून ते स्वातंत्र्यपूर्व काळात नाविक दल आणि लष्करी दलाचे एक प्रमुख हवाईतळ मानले जायचे. बेळगाव शहरे हे उत्तर कर्नाटकाच्या मध्यवर्ती ठिकाणी असून बेळगाव जिल्ह्याला एक महान ऐतिहासिक परंपरा आहे बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर येथील वीर राणी कित्तूर चन्नम्मा यांनी स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध मोठा लढा दिला.
बेळगाव विमानतळाच्या नूतन टर्मिनल बिल्डिंगचे उद्घाटन गेल्या 14 सप्टेंबर 2017 रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते झाले त्यावेळी बेळगाव सांबरा विमानतळाचे नाव बदलून ते ‘वीर कित्तूर चन्नम्मा विमानतळ’ असे करण्यात यावे यादृष्टीने प्राथमिक पावले उचलण्यात आली होती. परंतु आतापर्यंत मोठा कालावधी उलटून गेला तरी अद्याप बाबत अद्यापही याबाबत कोणतीही हालचाल झालेली नाही. यासंदर्भात आता आपण लक्ष घातले असून बेळगाव विमानतळाचे नामकरण वीर कित्तूर चन्नम्मा विमानतळ असे करावे या अनुषंगाने राज्य आणि केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याबाबत तातडीने हालचाल करावी असे जिल्हा प्रशासनाला सांगितले असल्याचे केंद्रीय राज्य रेल्वे मंत्री सुरेश अंगडी यांनी स्पष्ट केले आहे.
एखाद्या विमानतळाचे नांव बदलावयाची असेल तर त्यासाठी प्रथम राज्य मंत्रिमंडळात तसे विधेयक संमत करावे लागते. त्यानंतर केंद्रीय केंद्रीय मंत्रिमंडळात त्या विधेयकाला मान्यता मिळाल्यानंतर अखेर त्याची भारताच्या गॅझेटमध्ये नोंद केली जाते.