महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यानी शिक्षणाबरोबर ज्या-ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या लुटाव्यात जेणेकरून भविष्यात कोणतीही खंत राहणार नाही, असे विचार सुप्रसिद्ध अभिनेते- दिग्दर्शक सुबोध भावे यांनी व्यक्त केले.
टिळकवाडी येथील साउथ कोंकण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवाच्या रविवारी दुसऱ्या दिवशी सायंकाळी कॉलेज मैदानावर आयोजीत विशेष कार्यक्रमाप्रसंगी ‘अभिनेता म्हणून माझा प्रवास’ या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी एसकेई सोसायटीचे चेअरमन आर. डी. शानभाग, अध्यक्ष शेवंतीलाल शहा, रूट्स इन काश्मीर या संघटनेचे सह-संस्थापक सुशील पंडित, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचे राजकीय सचिव शंकरगोडा पाटील, दै. तरुण भारतचे संपादक आणि एसकेई सोसायटीचे उपसचिव किरण ठाकूर, महोत्सव आयोजन समितीच्या अध्यक्षा बिंबा नाडकर्णि यांच्यासह निवृत्त न्यायाधीश अजित सोलापूरकर तसेच एसकेई सोसायटीच्या संचालक मंडळातील एस. वाय प्रभू, पंकज शिवलकर, राज देशपांडे, लता कित्तूर, ज्ञानेश कलघटगी आदी सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश स्तुतीने झाली. उपस्थितांचे स्वागत बिंबा नाडकर्णी यांनी केले. यावेळी शेवंतीलाल शहा, आर. डी. शानभाग, भालचंद्र कलघटगी, विनायक आजगांवकर आदींच्या हस्ते अतिथींना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
अभिनेता सुबोध भावे पुढे म्हणाले की, मराठी नाटकाची सुरुवात बेळगावच्या सरस्वती वाचनालयमधून झाली हे जेंव्हा मला समजले तेंव्हा मी नतमस्तक झालो असे सांगून आपल्या नाट्यक्षेत्रातील प्रवासाची सुरुवात कॉलेज जीवनापासून झाल्याचे सांगितले. कॉलेज जीवनात योग्य दिशा मिळाली तरच जीवनालाही योग्य कलाटणी मिळते. नाट्य आणि संगीत क्षेत्रातील दिग्गज लोकांचा संदर्भ घेऊन सुबोध भावे यांनी एक अभिनेता म्हणून उद्बोधक मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.
रूट्स इन काश्मीरचे सहसंस्थापक सुशील पंडित यांनी काश्मीरमधील समृद्ध संस्कृतीचे भारतातील महत्व, काश्मीरमधील हिंदू पंडितांची सद्य परिस्थिती आणि त्यांचे अधिकार त्या संदर्भातील इतिहासातील कांही संदर्भ याची माहिती दिली.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी याप्रसंगी बोलताना आपल्या सर्व यशाचे श्रेय सोसायटीच्या गोविंदराम सक्सेरीया सायन्स (जीएसएस) कॉलेजला दिले. सोसायटीची ही जागा बेळगावची पुण्यभूमी आहे असे सांगून येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षणावर संपूर्ण लक्ष केंद्रित करून उज्वल भवितव्य घडवावे असेही ते म्हणाले.
अखेर आरडी शानबाग यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अरविंद हलगेकर यांनी केले. अखेर लता कित्तूर यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास निमंत्रीतांसह,पालक, प्राध्यापक आणि शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
मराठी प्रेक्षकांना नाटक पाहता येत नाही याची खंत सुबोध भावे यांचे प्रतिपादन-
काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी नाटक बेळगावला येऊ शकत नाही. माझ्या बेळगावच्या माय बाप रसिकांना मराठी नाटक पाहता येईल याची जबाबदारी घ्या आणि हा तिढा सोडवा, अशा शब्दात अभिनेते सुबोध भावे यांनी मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव शंकरगौडा पाटील यांना विनंती केली. बेळगावला संगीत नाटकाची परंपरा सुरू झाली. तिथून ती सर्वत्र पसरली. ज्या बेळगावमध्ये संगीत शाकुंतल नाटकाचा पहिला प्रयोग झाला. त्याच बेळगावमध्ये आज माझ्या मराठी प्रेक्षकांना नाटक पाहता येत नाही,याचा मनस्वी खेद व्यक्त करत तुम्ही या प्रÍनी लक्ष घाला, असे सुबोध भावे म्हणाले. एसकेई सोसायटीच्या अमृत महोत्सवी सोहळय़ाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना त्यांनी ही विनंती केली.