सांबरा येथील बेळगाव विमानतळ आवारात आयोजित भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आज रविवारी उत्साहात पार पडला. या वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत ग्रीन सेव्हियर्स संघटनेतर्फे 5100 वृक्षांच्या रोपट्यांचे रोपण करण्यात आले.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे बेळगाव विमानतळ, रोटरी क्लब ऑफ बेळगाव, रोटरी कनेक्ट द वर्ल्ड, सूर्योदय बँक, ड्रीम फ्लाय एव्हिएशन आणि हॉस्पिटॅलिटी अकॅडमी बेळगाव यांच्या सहकार्याने ग्रीन सेव्हियर्सने वृक्षारोपणाचा हा भव्य कार्यक्रम पार पाडला. रविवारीे बेळगाव विमानतळ आवारातील जागेत संघटनेच्या 800 कार्यकर्त्यांनी अवघ्या सव्वा दोन तासात झाडांची तब्बल 5100 रोपे लावली. आता पुढील दोन वर्ष समीर मजली यांच्या नेतृत्वाखाली ग्रीन सेव्हियर्सचे कार्यकर्ते या या वृक्षांच्या रोपट्यांची काळजी घेणार आहेत.
या वनमहोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध पर्यावरण तज्ञ व जलसंवर्धक शिवाजी कागणीकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बेळगाव विमानतळ संचालक राजेश कुमार मौर्य, बेळगाव उत्तर विभागाचे आयजीपी राघवेंद्र सुहास, शहर पोलीस आयुक्त लोकेश कुमार, ग्रीन सेव्हियर्सचे समीर मजली,आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अतुल शिरोळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.
ग्रीन सेव्हियर्स संघटनेने गेल्या 2016 पासून बेळगाव मध्ये जवळपास 20000 हून अधिक वृक्षांची लागवड केली आहे. या वृक्षांची व्यवस्थित निगा राखण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते दर रविवारी आपापल्या भागात फिरून कार्य करत असतात