बेरोजगार तरुणांना लष्करात भरतीचे आमिष दाखवून लाखो रुपयाला फसविणाऱ्या एका तोतया लष्करी अधिकाऱ्याला गुरुवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. आर्मी इंटेलिजन्स सदर्न कमांड, लायझर युनिट आणि बेळगाव पोलिसांनी संयुक्तपणे अनगोळ येथे ही कारवाई केली.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव कॅप्टन सागर पाटील (वय 28) असे असून तो मुळचा गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील रहिवासी आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनगोळ परिसरात वास्तव्यास असणाऱ्या सागर पाटील यांच्याकडून पोलिसांनी दोन बनावट रिवाल्वर देखील जप्त केल्या आहेत. प्राथमिक चौकशीत सागरने लष्करात भरती करण्याचे आमिष दाखवून वडगाव आणि खासबाग भागातील सुमारे 10 हून अधिक बेरोजगार तरुणांकडून मोठी रक्कम उचलल्याची माहिती मिळाली आहे.
गुरुवारी रात्री उशीरापर्यंत बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात त्याची अधिक चौकशी सुरू होती. त्याने एकूण किती जणांची फसवणूक केली आहे याची माहिती मिळविण्यात येत असून संपूर्ण चौकशी अंती त्याला अटक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, तोतया सागर पाटील याला अटक झाल्याची बातमी कर्णोपकर्णी होताच गुरुवारी रात्री बेळगाव ग्रामीण पोलीस पोलीस स्थानकात समोर नागरिकांची गर्दी झाली होती.
Very good news channel app