एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलचा विद्यार्थी आणि स्विमर्स क्लब बेळगावचा होतकरू जलतरणपटू तनिष्क दीपक मोरे याची येत्या 17 ते 22 जानेवारी 2020 या कालावधीत होणाऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा महोत्सवासाठी निवड झाली आहे.
खेलो इंडिया राष्ट्रीय क्रीडा महोत्सव गुवाहाटी (आसाम) येथे आयोजित केला जाणार असून या क्रीडा महोत्सवातील जलतरण विभागाच्या मुलांच्या 17 वर्षाखालील गटामध्ये तनिष्क मोरे याचा सहभाग असणार आहे. खेलो इंडियाच्या 200 मीटर बटरफ्लाय स्ट्रोक आणि 200 मीटर इंडिव्हिज्युअल मिडले या दोन जलतरण प्रकारात तो कर्नाटकाचे प्रतिनिधित्व करणार आहे. मागील महिन्यात स्कूल गेम फेडरेशनतर्फे नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या शालेय पातळीवरील राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत तनिष्क मोरे याने सुवर्णपदकांची लयलूट केली होती यामुळे खेलो इंडियासाठी निवडल्या गेलेल्या आठ जलतरणपटूच्या यादीमध्ये तो पाचव्या स्थानावर होता. या पद्धतीने खेलो इंडिया क्रीडा महोत्सवासाठी जलतरण प्रकारात निवडला गेलेला तनिष्क हा बेळगावातील एकमेव जलतरणपटू आहे.
![tanishq more](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2017/01/tanishq-more.jpg)
कर्नाटक राज्य जलतरण संघटनेने अलीकडेच म्हैसूर येथे आयोजित केलेल्या राज्य पातळीवरील शालेय जलतरण स्पर्धेत तनिष्कने 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली होती. अगदी लहानपणापासूनच जलतरणाची आवड असणाऱ्या तनिष्क मोरेने आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे. खेलो इंडियामध्ये सहभागी झालेला तनिष्क मोरे हा दररोज सकाळी 3 तास केएलई जलतरण तलावात आणि सायंकाळी 2 तास गोवावेस येथील रोटरी कार्पोरेशन जलतरण तलावात जलतरणाचा सराव करतो.
टिळकवाडीतील एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलमध्ये इयत्ता 8 मध्ये शिकणारा 15 वर्षीय तनिष्क हा बेळगावचे सुप्रसिद्ध माजी शरीरसौष्ठवपटू आणि मारुती गल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक दीपक मोरे यांचा चिरंजीव आहे. तनिष्क मोरे याला जलतरण प्रशिक्षक अक्षय शरेगार व प्रसाद तेंडुलकर यांचे मार्गदर्शन तसेच बेळगाव जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष उमेश कलघटगी, हेरवाडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि आई-वडिलांचे प्रोत्साहन लाभत आहे.
बेळगाव शिवसेनेच्या वतीनं तनिष्क याचा सत्कार करून त्याला खेलो इंडिया साठी शुभेच्छा देण्यात आल्या.