बेळगावच्या सांबरा विमान तळावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना प्रवेशबंदी करा अशी हास्यास्पद मागणी करत कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या मूठभर कार्यकर्त्यांनी बेळगाव विमान तळासमोर आंदोलन केलं.याबाबत या कन्नड संघटनेनं विमान तळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांना निवेदन दिले आहे.
बेळगाव सीमाप्रश्नी आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना सांबरा विमानतळावर प्रवेश देऊ नये,त्यांना येथून प्रवास करायला बंदी आणावी .हे कन्नड जनतेचा वारंवार अपमान करत आहेत असे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील सेना ,एन सी पी चे आमदार ,नेते मुंबई आणि अन्यत्र ये जा करण्यासाठी बेळगाव विमान तळाचा वापर करतात .चंदगडचे आमदार राजेश पाटील महाराष्ट्र समितीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते . महाराष्ट्रातील नेते सीमाप्रश्नावर बेळगावातील मराठी जनतेला भडकावत असतात.
कन्नड जनतेच्या भावनांचा अनादर त्यांनी केलाय असा आरोप नवनिर्माण सेनेच्या मूठभर कार्यकर्त्यांनी केला. कन्नडद्वेष्ट्या महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव विमानतळावर प्रवेश देऊ नये,त्यांना येथून प्रवास करायला बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
आगामी काळात महाराष्ट्राच्या शिवसेना व राष्ट्रवादीच्या आमदारांनी बेळगाव विमानतळावरून प्रवास केल्यास विमानतळास घेराव घालण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. यावेळी बाबू संगोडी, नागराज दोडमनी आदी कर्नाटक नव निर्माण सेनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
याच कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमा शंकर पाटील यांनी समिती नेत्यांना गोळ्या घाला असे वादग्रस्त वक्तव्य केले त्याचे पडसाद बेळगाव सह महाराष्ट्रात अजुनही उमटत आहेत आता त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना विमान तळावर बंदीची भाषा सुरू केली आहे.