पत्रकाराने केवळ प्रश्न मांडून चालणार नाही तर त्याची सोडवणूक करण्यासाठी त्याने प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे . आपल्या पत्रकारीतेचे श्रेय तरुण भारतचे आहे . पत्रकार समाजासमोर दिसतो . परंतु बातमी समोर येते तेंव्हा ते श्रेय संपूर्ण राबणाऱ्या अनेक हातांचे असते . अशा शब्दात पत्रकार मनीषा सुभेदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
तरुण भारतमध्ये गेल्या २५ वर्षांपासून अधिक काळ पत्रकार म्हणून कार्य करणाऱ्या मनीषा सुभेदार यांना बुधवारी राष्ट्रीय महिला फेडरेशनच्या (एनएफआयडब्ल्यू ) दुसऱ्या राज्यस्तरीय परिषदेत ‘ कॉ. अरुणा असफ अली ‘ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘ दी आयर्न लेडी ऑफ बेळगाव ‘ या शब्दात त्यांच्या पुरस्कारावर नोंद करण्यात आली आहे.
फेडरेशनच्या राष्ट्रीय सचिव अरुणा सिन्हा यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले . व्यासपीठावर अँड परिमळा विजयकुमार , वंदना पुराणिक , भाऊ गडकरी , एन . एस . भरमगौडर, बशीर मुधोळ , गीता कटगी , माधुरी होनगेकर , सायरा बानु आदी उपस्थित होते.
मनीषा सुभेदार पुरस्काराला उत्तर देताना म्हणाल्या, जेव्हा या क्षेत्रात पूर्णपणे पुरुषांचाच सहभाग होता त्या काळात किरण ठाकुर यांनी आपल्याला संधी दिली हे महत्वाचे. आजपर्यंत केलेल्या सर्व कार्यामध्ये बेळगावकरांचा पाठिंबा महत्वाचा आहे असेही त्यांनी नमूद केले.

अरुणा सिंन्हा म्हणाल्या , महिलांचा अत्याचाराविरोधात फेडरेशन अखंड लढा देत आहे. देशातील २२ हून अधिक राज्यात फेडरेशनचे काम सुरु आहे. संघटीतपणे लढा दिल्यास अनेक प्रश्नांची साडवणुक होवू शकते. प्रारंभी फेडरेशनच्या राज्यसचिव प्रमोदा हजारे यांनी स्वागत केले. भाऊ गडकरी यानी फडरेशनने समाज माध्यमांवर एकत्र यावे म्हणजे अनेक प्रश्न मार्गी लागतील , असे सांगितले .
एन एफ आय डब्ल्यू च्या या दुसऱ्या राज्यस्तरीय परिषदेत महत्वाचे तीन ठराव करण्यात आले . संसदेमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण मिळावे व त्याची अंमलबजावणी तातडीने करावी . गुन्हेगारांना निवडणुकीला उभे राहण्यास मान्यता देवूच नये, महिलांच्या मंजूर करुन यावेत, महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे तसेच बीपीएल कार्डधारकांना विविध योजनांतर्गत प्लॉट मंजूर करून द्यावेत, असे ठराव करण्यात आले.