भाजप सोडून सगळ्या भिन्न विचारधारा असणारे पक्ष सत्ता स्थापनेसाठी एकत्र आले आहेत.त्यांचा किमान समान कार्यक्रम ठरलाय.किमान समान कार्यक्रम बघून आम्ही निर्णय घेणार.किमान समान कार्यक्रमात शेतकरी,ग्रामीण युवकांना रोजगार,कर्जमाफी संबंधी ठोस भूमिका असेल तर महा आघाडीचा निर्णय घेणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बेळगाव येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
गेल्या वर्षभरात सरकारने साखरेच्या निर्यातीसाठी प्रोत्साहन दिले पण सबसिडीची रक्कम सरकारने साखर कारखान्यांना दिली नाही.त्यामुळे दुसरीकडून पैसे घेऊन कारखान्याला व्याज भरावे लागत आहे.म्हणून साखर कारखाने अडचणीत येत आहेत.निर्यातीला सबसिडी द्यायची आणि कच्ची साखर आयात करायची असे केंद्र सरकारचे मागच्या वर्षीचे धोरण होते.
केंद्रसरकारच्या धोरणात सुसूत्रता नसल्यामुळे साखर उद्योगावर परिणाम झालाय अशी टीकाही राजू शेट्टी यांनी केली.भाजपने राष्ट्रपती पदाची ऑफर जरी शरद पवार यांना दिली तरी पवार साहेब भाजप सोबत जाणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जयसिंगपूर येथे 23 नोव्हेंबर रोजी 18 वी राष्ट्रीय ऊस परिषद आयोजित करण्यात आली आहे.या ऊस परिषदेत साखर दर एफ आर पी बाबत चर्चा होणार आहे.
बेळगाव सह सीमा भागातून शेतकऱ्यांनी या परिषदेत सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केलं.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्ड्यानावर, बेळगाव शेतकरी संघटनेच्या जयश्री गुरननावर आदी उपस्थित होते.